8 महिन्यांपासून विद्यावेतन नाही, निवासी डॉक्टर संपावर

उस्मानाबाद | गेल्या 8 महिन्यांपासून विद्यावेतन न मिळाल्यामुळे उस्मानाबादच्या निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलंय. ओपीडी आणि आयपीडी बंद ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय. अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहतील, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. 

8 महिन्यांपासून 1 रुपयाही विद्यावेतन न मिळाल्याने निवासी डॉक्टरांना आपल्या दैनंदिन गरजा भागवणंही अवघड होऊन बसलंय. तसेच त्यांचं रिसर्च वर्कही थांबलंय. त्यांनी यासंदर्भात आयुर्वेद संचलनालयाशी पत्रव्यवहार केला, मात्र त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे फोनवर बोलणं झाल्यानंतर “तुम्हाला काय करायचं ते करा” असं उर्मट उत्तर त्यांना देण्यात आलं. त्यामुळे डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचं या डॉक्टरांनी सांगितलंय. मात्र यानिमित्ताने राज्याची वैद्यकीय नाडी सांभाळणाऱ्या निवासी डॉक्टरांचं विद्यावेतन देण्यासाठीही सरकारी तिजोरीत पैसा नाही का? असा सवाल उपस्थित होतोय.