Pahalgam Attack | जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक मृत्युमुखी पडले. या हल्ल्यातून बचावलेल्या आसाम विद्यापीठातील एका प्राध्यापकाने आपला अंगावर काटा आणणारा अनुभव कथन केला आहे. केवळ कलमा वाचल्यामुळे आपण वाचलो, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हल्लेखोरांचे फोटो समोर आले आहेत.
हल्लेखोरांची ओळख उघड?
पहलगाममधील (Pahalgam) हल्ल्यात नाव आणि धर्म विचारून गोळीबार करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांचे छायाचित्र समोर आले असून, त्यातील दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक असल्याची माहिती उघड झाली आहे. याच हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्यांमध्ये प्रा. देबाशिष भट्टाचार्य (Debashish Bhattacharya) यांचा समावेश आहे.
प्रा. भट्टाचार्य हे आसाम विद्यापीठात (Assam University) बंगाली विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या कुटुंबासमवेत जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir) पर्यटनासाठी आले होते. एका झाडाखाली विश्रांती घेत असताना अचानक गोळीबार सुरू झाला आणि त्यांच्यासमोर मृत्यू उभा ठाकला होता, असे त्यांनी सांगितले.
‘त्याने मागच्याला गोळी घातली’
प्रा. भट्टाचार्य यांनी घडलेला प्रसंग सविस्तर सांगितला. ते म्हणाले, “आम्ही झाडाखाली बसलेलो असताना समोरच्या मैदानातून मोठ्याने कलमा पठणाचा आवाज आला. काही कळायच्या आत गोळीबार सुरू झाला. त्याचवेळी एक दहशतवादी समोर आला. त्याने माझ्या मागे असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडली आणि ‘तुम्ही काय करत आहात?’ असे विचारले. मला काहीच सुचले नाही, म्हणून मी मोठ्याने कलमा वाचायला सुरुवात केली.”
“तो दहशतवादी काही क्षण तिथेच उभा होता, पण नंतर तो पुढे निघून गेला. मी पत्नी आणि मुलाला घेऊन तात्काळ डोंगराच्या दिशेने चालू लागलो, मागे वळूनही पाहिले नाही.” सुमारे दोन तास चालल्यावर त्यांना एक लोखंडी कुंपण दिसले, ते ओलांडून पुढे गेल्यावर एक घोडेवाला भेटला. त्याच्या मदतीने ते हॉटेलवर पोहोचले आणि सायंकाळी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी सर्व शक्ती एकवटून आपबिती कथन केली.
Title : Pahalgam Attack: Professor Recited Kalma, Survived