Panhala Fort l कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला ठरणार आहे. तसेच, हा किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळवेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पन्हाळगडाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पन्हाळागडावर १३ डी थिएटर आणि ‘पन्हाळागडाचा रणसंग्राम’ लघुपटाचे अनावरण :
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळा किल्ल्यावर १३ डी थिएटरचे उद्घाटन तसेच ‘पन्हाळगडाचा रणसंग्राम’ या लघुपटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पन्हाळगडावरील १३ डी थिएटरच्या माध्यमातून इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. शिवरायांच्या युद्धप्रसंगांवर आधारित हा शो पाहताना रणभूमीतील अनुभव मिळेल. इतिहास केवळ वाचण्यापुरता नसून तो प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा असावा, असे ते म्हणाले.
Panhala Fort l जोतिबा प्राधिकरणास मान्यता मिळणार :
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोतिबा मंदिर विकास आराखड्यास लवकरच प्राधिकरण मान्यता देण्याचे आश्वासन दिले. आगामी १५ दिवसांत हे प्राधिकरण स्थापन केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट केल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात दुसरे सादरीकरण करण्यासाठी ते मे २०२५ मध्ये पॅरिसला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
यावेळी आमदार विनय कोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना शिलाहार राजवटीतील सोन्याची मुद्रा भेट दिली. तसेच, राष्ट्रपती पदक विजेते विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा सत्कार करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व आमदारांना पन्हाळगड भेट देण्याचे आवाहन केले.
पन्हाळगडाच्या पुनर्निर्माणासह येथे ऐतिहासिक वस्त्रप्रावरणे, मुद्रा, नाणी, शस्त्रसामग्री यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ऐतिहासिक वस्त्रांचा आढावा घेतला आणि ‘पन्हाळगडाचा रणसंग्राम’ लघुपट पाहिला. त्यांना यावेळी चांदीची तलवार भेट देण्यात आली.