Pankaja Munde | मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि सगेसोयरे अंमलबजावणीची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. याचपार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजातील आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. यावरून आता भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता ट्विट करत टोला लगावला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे जालन्यातील अंतरवाली सराटीजवळील वडीगोद्री येथे आंदोलन आणि उपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत सहकारी नवनाथ वाघमारे देखील आंदोलन आणि उपोषण करत आहेत. आजचा उपोषणाचा त्यांचा नववा दिवस आहे. या ओबीसी आरक्षणाचं कौतुक आता भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) केलं आहे. पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) ट्विट करत पोस्ट केली आहे.
पंकजा मुंडेंचं ट्विट
ओबीसी समाजाचे आंदोलक आणि उपोषणकर्ते लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी उपोषण करत आहेत. यामुळे आता पंकजा मुंडेंनी ट्विट करत लक्ष्मण हाकेंचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं, “आंदोलन कसे करावे सालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटनेबद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर वडीगोद्रीमध्ये पहा…वाह रे वाह..”, असं ट्विट पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) केलं आहे.
आंदोलन कसे करावे सालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटने बद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर
वडी गोदरी मध्ये पहा…वाह रे वाह..— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 21, 2024
आष्टी तालुक्यात महिला रस्त्यावर उतरल्या
ट्विटच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी नेमका इशारा कोणाला दिला आहे. याची आता चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी टायरची जाळपोळ केली असल्याची माहिती समोर आली आहे. भावनांचा विचार न केल्यास दुर्गेचा अवतार धारण करू, असा इशारा महिलांनी दिला आहे.
आंदोलनास्थळी राज्यातील मंत्र्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. यावेळी भाजप नेते गिरीश महाजन, अतुल सावे, उदय सामंत, संदीपाम भुमरे यांनी भेट घेतली. ओबीसी समाजाच्या वतीने छगन भुजबळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, आणि विजय वडेट्टीवार यांचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करणार आहे.