मी दहावीत असताना शरद पवारांवर निबंध लिहिला होता- पंकजा मुंडे

औरंगाबाद | “किल्लारीला भूकंप झाला तेव्हा मी दहावीत होते. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा शाळेत ‘मी पाहिलेला मुख्यमंत्री’ या विषयावर निबंध लिहायचा होता. मी शरद पवारांवर निबंध लिहिला होता.”

राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही आठवण सांगितली. औरंगाबादमध्ये शरद पवारांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारण पवारांचं नाव ‘पावर’ म्हणून वापरलं जातं, असं पंकजांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

आणखी वाचा-

विधीमंडळ आणि संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने नेवाशात आणि मराठवाड्याच्या वतीने औरंगाबादमध्ये शरद पवारांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमातील शरद पवार यांची भाषणं जशीच्या तशी…

शरद पवार यांचं नगरमधील संपूर्ण भाषण-

अहमदनगर येथे आज आयोजित केलेल्या माझ्या नागरी सत्काराबद्दल सर्वांचे आभार; हा सन्मान स्वीकारताना तसेच ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग अभंग साहेबांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यास उपस्थित राहताना मनापासून आनंद वाटला. सच्चे, सदाचारी, सहकार्य करणारे अशी पांडुरंग अभंग यांची ओळख आहे. जी जबाबादारी दिली ती पार पाडण्याची, काम करण्याची ज्या नेत्यांची मालिका आहे त्यात पांडुरंग अभंग यांचं नाव आहे. जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याची वृत्ती त्यांच्यात आहे.

नगर जिल्ह्यातून अनेक बहुआयामी व्यक्तिमत्व राज्याला मिळाली आहेत. या अहमदनगरात मी एक चत्मकार पाहिला. इथे लोक एकमेकांना सहाय्य करतात आणि एकमेकांना पुढे जाण्याची संधी देतात. मारुतीराव घुले आणि पांडुंरग अभंग हे त्याचं उदाहरण आहे. पांडुंरग अभंग आणि मारुतीराव घुले यांनी असंख्य कामे केली म्हणून आजच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जमली होती.

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले, सामान्य माणसाची सेवा करणारे, जनतेकडून मिळालेल्या संधीचे सोने कसे होईल याची अखंड खबरदारी घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे अभंगराव. १९९५ च्या विधानसभेच्या तोंडावर मारूतराव घुले पाटलांची गाठ पडली, त्यांनी पांडुरंगराव अभंगांचं नाव सुचवलं. मला आश्चर्य वाटले. पण अभंगरावांनी निवडून आल्यावर मारूतरावांचा विश्वास सार्थ ठरवला.

सत्ता नसताना दहादा मंत्र्यांकडे, अधिकाऱ्यांकडे जाणारे, जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे आमदार म्हणून त्यांची ओळख झाली. पुढच्या निवडणुकीत पांडुरंग रावांनी स्वत:हून आमदारकीचं तिकीट नाकारून स्वत: दोन पाऊले मागे राहून दुसऱ्याला मोठं करण्याचा आदर्श या जिल्ह्यात घालून दिला. मी मनापासून त्यांच्या दीर्घायूष्यासाठी प्रार्थना करतो.

अहमदनगरच्या पाणी प्रश्नांसाठी मंचावरील मान्यवरांनी तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांनीही असा आग्रह धरला. राम शिंदे यांच्या खाली आणि वरही सत्ता आहे. तरी पाण्याप्रश्नी ते मला लक्ष घालण्यास सांगत आहेत. ते म्हणतात म्हणून मी लक्ष घालतो खरंतर पाण्याचा प्रश्न हा यक्ष प्रश्न आहे. वाहून जाणारे पाणी जायकवाडीकडे वळवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.

सध्या कर्जमाफीची चर्चा संपूर्ण देशात आहे. ७८ साली मी मुख्यमंत्री असताना शेतीकर्ज १२ टक्क्यांवरून ३ टक्के करण्याची भूमिका आम्ही घेतली होती. आज सत्तेत असलेल्या लोकांनी शेतमाल खर्च व त्यावर ५० टक्के देण्याची भूमिका प्रचारात घेतली होती. ते होत नाही तोपर्यंत कर्जमाफीची मागणी होत राहिल. आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा, शेतमालाला योग्य भाव द्या, पाण्याची सोय करा, खते बियाणे स्वस्त करा, जनतेला सन्मानाने जगण्याची व्यवस्था करा, हा शेतकरी पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार नाही. घेतलेली कर्ज शेतकरी कधी ठेवत नाही मात्र आज त्याच्यावर परिस्थिती वाईट आहे.

शेतकरी संकटात असताना आज सरकारने दात कोरून नाही तर मोकळ्या हाताने त्याला मदत करायला हवी. सरसकट एकहाती कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी, शेतकऱ्यांना एकदा सावरा, शेतकरी देशाचा चेहरा बदलतील. उत्तर प्रदेश मध्ये ज्याप्रमाणे कर्जमाफी झाली तशी महाराष्ट्रात संपूर्ण कर्जमाफी व्हावी. कालच झालेल्या निर्णयानुसार अडचणीत असलेल्या कारखानदारांचं ८२ हजार कोटींचं कर्जमाफ केलं गेले. मग शेतकऱ्यांचं ३२ हजार कोटी रुपयांचं कर्जमाफ का केलं जात नाही?

काल थोडासा कांद्यांचा भाव वाढला तर त्याबाबत संसदेत चर्चा घडली. चर्चा कसली करताय? जेव्हा कांद्याला भाव नव्हता, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं तेव्हा कोणी काही बोललं नाही. सरकार म्हणतंय जर तुमच्या डोक्यावर ६ लाखांचं कर्ज आहे तर त्यांनी साडेचार तुम्ही भरा आम्ही दीड भरू. आमचं असं सांगणं आहे की दीड तुम्ही भरा आणि साडे चार लाख भरण्यास आम्हाला हफ्त्यांची सुविधा द्या.

माझं आग्रही मत आहे की या देशातील ग्रामीण भागातील लोकांची खरेदीची क्षमता वाढली पाहिजे. या देशात ६० टक्के लोक हे ग्रामीण भागात राहतात. या लोकांची कार्यक्षमता वाढली तरच देश विकास करेल. हे सूत्र डोक्यात राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवे.

शरद पवार यांचं औरंगाबादमधील संपूर्ण भाषण- 

माझ्या संसदीय कारकिर्दीस ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज औरंगाबाद येथे नागरी सत्कार समिती व संपूर्ण मराठवाड्याच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून माझ्याबद्दल बोलले त्याबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे. मंचकावर सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहता महाराष्ट्रात सभ्य राजकारणाची पद्धत आजही कायम आहे हे पाहून समाधानही वाटलं.

माझ्या जडणघडणीत अनेकांचा हातभार आहे. मी महाराष्ट्राचे सगळे जिल्हे फिरलो. राज्याच्या कान्याकोपऱ्यात जाऊन आलो. त्यामुळे तिथली माणसं समजली, संस्कृती समजली याचा आनंद आहे. काँग्रेसमध्ये असताना एकदा असं घडलं की शरद पवारला टिकीट द्यायचं नाही असं काहींनी ठरवलं. ही बाब विनायक पाटील आणि मा. यशवंतराव चव्हाण यांना कळली आणि त्यांनी त्या मंडळींना मला टिकीट देण्यास सूचना केल्या. विनायकराव आणि यशवंतराव यांची शक्ती माझ्यामागे होती म्हणून मी विधानभवनात पोहोचू शकलो. मराठवाड्यातून अशी अनेक चांगली माणसं मला लाभली. हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ठेवा आहे. संकटं अनेक आली पण त्या संकटांना सामोरे गेलो.

मुख्यमंत्री असताना लातूर येथे भूकंप झाल्याची बातमी मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता जिथे भूकंपाचं केंद्र स्थान होतं त्या गावात दाखल झालो. तिथली परिस्थिती फार वाईट होती. असं भयानक चित्र मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं. संपूर्ण लक्ष तिथे केंद्रित करत लोकांना मदत केली. दोन-तीन महिने पुरेल इतका धन्यसाठा तिथे उपलब्ध केला. सर्व निर्णय तात्काळ घेतले. संकटात महाराष्ट्राला सोडायचं नाही अशी भावना त्यावेळी मनात होती. लातूरसाठी संपूर्ण महाराष्ट्र धावून आला होता. यानिमित्ताने मराठवाड्याची एकी दिसली.

नामांतराच्या वेळीही अशाच संकटांना समोरे जावे लागले. दंगली पेटल्या होत्या, विद्यार्थ्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं, पण शेवटी विद्यापीठाचा नामविस्तार केलाच. मला संपूर्ण कारकीर्दीत विकासकामांची संधी मिळाली. या कामांमध्ये लोकांची साथ लाभली त्यासाठी त्यांचे आभार मानतो.

सध्या राज्यभरात कर्जमाफीची चर्चा आहे. काही लोक विचारतात कशासाठी हवी आहे कर्जमाफी? आज आपण सर्वच जण शेतकऱ्यांवर अवलंबून आहोत त्यामुळे त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा भार कमी व्हायलाच हवा. शेतकरी काही भीक मागत नाहीत. देशाच्या प्रमुखाने संपूर्ण देशाचा विचार करावा केवळ एका राज्याचा नवे. उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे कर्जमाफी केली त्याप्रमाणे राज्यात ही सरसकट कर्जमाफी व्हायला हवी.⁠⁠⁠⁠