Santosh Deshmukh | बीड जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या क्रूर हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राजीनामा द्यावा लागला. या संपूर्ण प्रकरणावर आता धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि भाजपच्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“हे फोटो पाहण्याची माझीही हिंमत नाही”
पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्या आईची जाहीर माफी मागितली आहे. त्या म्हणाल्या, “मी इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ आणि पोस्ट पाहिल्या, पण ते उघडून पाहण्याचीही माझी हिंमत झाली नाही. ज्यांनी संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) इतक्या अमानुषपणे मारलं, एवढं करून त्याचा व्हिडीओ शूट केला, त्यांच्यात माणुसकी शिल्लक राहिली नाही. पण माझ्यात ती आहे, त्यामुळे हे फोटो पाहण्याची हिंमत नाही.”
पंकजा मुंडे म्हणाल्या, “संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मी सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं होतं. १२ डिसेंबरला मी या प्रकरणावर संपूर्ण भूमिका स्पष्ट केली होती.” “यामध्ये कोण दोषी आहे, कोण नाही, कोणाचा हात आहे, हे ठरवण्याचे काम केवळ तपास यंत्रणांचे आहे. मी यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याची गरज नाही,” असे त्या म्हणाल्या.
या प्रकरणातील आरोपींमुळे संपूर्ण समाजाला जबरदस्त तोंड द्यावं लागत आहे, याकडेही पंकजा मुंडे यांनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, “ज्या तरुणांनी ही क्रूर हत्या केली, त्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाची मान खाली गेली आहे. ते कुठल्या जाती-धर्माचे आहेत याला काहीही महत्त्व नाही, मात्र त्यांनी केलेल्या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण राज्याला कलंक लागला आहे.”
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय?
या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना अखेर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, मात्र विरोधक त्यावर समाधानी नाहीत. अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, राजकीय पटलावर अजूनही यावर जोरदार चर्च सुरू आहे. आता पुढील काही दिवसांत या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया आणि तपासाची दिशा महत्त्वाची ठरणार आहे.