Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठे संकेत दिले आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. “नव्या लोकांना संधी द्या,” असे ते म्हणाले. पाटील यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि कार्यकर्त्यांनी ‘नाही नाही’ म्हणत त्यांच्या इच्छेला विरोध दर्शवला.
पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे.” त्यांनी शरद पवारांना विनंती केली की, “नवीन लोकांना संधी द्यावी. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे.” त्यांच्या या विधानानंतर कार्यकर्त्यांनी त्यांची इच्छा फेटाळून लावत त्यांनाच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली.
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “ज्या शिवभोजन थाळीने अनेकांना तारलं, तीच शिवभोजन थाळी सरकारने बंद केली,” असा टोला त्यांनी लगावला. “एखाद्या मुलीला जीव द्यावा लागतो, तेव्हा सरकार त्याची नोंद घेतं,” असे म्हणत त्यांनी सरकारला महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून धारेवर धरले.
‘पवार साहब का डर अभी भी बाकी है’
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. “पवार साहेबांवर विनाकारण टीका सुरू आहे. पवार साहेबांनी ओबीसीच्या हक्काची कायम भूमिका घेतली आहे,” असे ते म्हणाले. “मंडल आयोग लागू करण्याची भूमिका कोणी घेतली असेल, तर शरद पवार नावाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली,” अशी आठवण त्यांनी करून दिली. “ओबीसींच्या हक्काचं काम आयुष्यभर शरद पवारांनी केलं, हे विसरता कामा नये. आजही त्यांचं तेच काम आहे, ओबीसींच्या हिताच्या रक्षणाचे काम ते करत आहेत,” असे उद्गार त्यांनी काढले. “पवार साहेबांना अजूनही टीकेचे लक्ष केले जाते, कारण ‘पवार साहब का डर अभी भी बाकी है’,” असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विधानसभा निवडणुकीत आलेल्या निराशाजनक निकालावरही त्यांनी भाष्य केले. “महाविकास आघाडीच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे, असं ११ कोटी जनतेला वाटत होतं. मात्र, निकाल वेगळे लागले,” असे ते म्हणाले. देशाच्या विरोधी पक्षनेत्याने निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत, पण त्यावर निवडणूक आयोग काही बोलत नाही, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
दरम्यान, जयंत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “गेल्या १४-१५ वर्षात पक्षाने मोठे यश मिळवले. पण २०१४ साली भाजपची सत्ता आली आणि बरीच लोकं आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागली. मात्र कार्यकर्ते शरद पवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. तुमचं कौतुक मला यासाठीच आहे की अनुकूल असो, प्रतिकूल असो, यश मिळो अथवा न मिळो, तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आयुष्यभर साथ दिली.”