Pimpri Chinchwad | (2 फेब्रुवारी) रोजी पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) निगडी प्राधिकरणाच्या (Nigdi Pradhikaran) सेक्टर 24 मध्ये एक नर बिबट्या (Male Leopard) दिसला. वन विभाग आणि RESQ चॅरिटेबल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) संयुक्त मोहिमेत अवघ्या दोन तास आणि पंधरा मिनिटांत या बिबट्याला पकडण्यात आले.
वन विभागाने याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे, पुणे वन विभागाचे (Pune Forest Division) सहाय्यक वनसंरक्षक (ACF) दीपक पवार (Deepak Pawar) यांना सकाळी 9 च्या सुमारास निगडी प्राधिकरणाच्या निवासी भागात एक बिबट्या दिसल्याची टिप मिळाली. पवार यांनी तात्काळ पथकाला (Team) माहिती दिली आणि वन अधिकारी (Forest Officials) आणि RESQ चे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली.
परिसराची नाकेबंदी-
सेक्टर 24 मधील संत कबीर उद्यानात प्रथम दिसलेला हा बिबट्या नंतर जवळच्या एका बंगल्याकडे गेला आणि मागच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडच्या मागे लपला. दरम्यान, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जमलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. पथकाने बिबट्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, तो प्राणी सार्वजनिक उद्यानात परतला आणि एका खोलीच्या बाजूला लपला ज्यामध्ये एक महिला आणि दोन तरुण होते.
RESQ चॅरिटेबल ट्रस्टने दिलेल्या माहितीनूसार, “अचूक आणि वेळेवर हस्तक्षेप करण्याची गरज ओळखून, RESQ CT च्या पशुवैद्यकीय अधिकारी ॉडॉ कल्याणी ठाकूर यांनी बिबट्याला सुरक्षितपणे बेशुद्ध केले. एकदा सुरक्षितपणे स्थिर झाल्यानंतर, या प्राण्याला उद्यानातून काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीसाठी बचाव रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. निरोगी नर असलेला हा बिबट्या सध्या बावधन येथील वाइल्डलाइफ ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये तपासणीखाली आहे.”
दोन बिबट्या दिसल्याच्या अफवा-
सुरुवातीला, पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) निगडी प्राधिकरणाच्या सेक्टर 24 मध्ये दोन बिबट्या दिसल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरू लागल्या आणि त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, बचाव पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दुसऱ्या बिबट्याच्या उपस्थितीला पुष्टी देणारा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे स्पष्ट केले. “उद्यानाच्या (Park) आसपासच्या निवासी भागातील दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये (CCTV Cameras) बिबट्या दिसल्याने बहुधा ही अफवा पसरली असावी,” असे एका वन अधिकाऱ्याने सांगितले.
बिबट्या निगडी प्राधिकरण परिसरात कसा आला?
बिबट्याला यशस्वीरित्या पकडल्यानंतर आणि त्याला बावधन येथील वाइल्डलाइफ ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेल्यानंतर, वन विभागाने आता बिबट्या निगडी प्राधिकरण परिसरात कसा आला याचा तपास सुरू केला आहे.
वन्यजीव तज्ञांनी केलेल्या अनेक दाव्यांपैकी एक असा आहे की तो बहुधा देहू ते निगडी (Nigdi) असा प्रवास करून आला असावा आणि हरित पट्ट्याने त्याला सुरक्षित रस्ता उपलब्ध करून दिला असावा, तर दुसरी थिअरी अशी आहे की बिबट्या बहुधा चिखली ते निगडी असा प्रवास करून आला असावा.