Crime News l पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. चाकणजवळील सावरदरी येथे एक धक्कादायक घटना घडली, जिथे एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पतीवर धारदार शस्त्राने हल्ला :
अंकिता अजयकुमार सिंग (Ankita Ajaykumar Singh) आणि तिचा प्रियकर सचिनकुमार उपेंद्र राजभर (Sachinkumar Upendra Rajbhar) यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. अजयकुमार सिंग (Ajaykumar Singh) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले. गंभीर जखमी झालेल्या अजयकुमार यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार चाकण (Chakan) औद्योगिक क्षेत्रात नोकरी करतात. लग्नाआधीपासूनच पत्नी अंकिताचे सचिनकुमारसोबत प्रेमसंबंध होते, आणि याची कल्पना अजयकुमार यांना होती. त्यांनी पत्नीला सचिनकुमार सोबत बोलण्यास मनाई केली होती.
रविवारी मध्यरात्रीनंतर, घरात कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आल्याने अजयकुमार जागे झाले. खोलीत डोकावून पाहिल्यावर त्यांना सचिनकुमार दिसला. अचानक समोर आलेल्या अजयकुमार यांना पाहून दोघेही गोंधळले.
Crime News l हत्येचा कट आणि पोलिसांची कारवाई :
अजयकुमार यांनी सचिनकुमारला तिथे येण्याचे कारण विचारले असता, अंकिता आणि सचिनकुमार यांनी मिळून अजयकुमार यांना मारहाण सुरू केली. अंकिताने भाजी कापण्याचा चाकू आणून अजयकुमार यांच्या छातीवर आणि पोटावर अनेक वार केले. जीव वाचवण्यासाठी अजयकुमार यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि ते घराबाहेर पळाले. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले. जमलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत, हल्लेखोरांना खोलीत कोंडून ठेवले व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अंकिता आणि सचिनकुमारला अटक केली.