PM Kisan Scheme l पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-Kisan Samman Nidhi Yojana) 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून, तो येत्या सोमवारी, 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे. तर, महाराष्ट्रातील सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा :
या योजनेअंतर्गत, राज्यातील 92 लाख 89 हजार पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल. म्हणजेच, एकूण 1 हजार 967 कोटी रुपयांहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
PM Kisan Scheme l योजनेची माहिती आणि विलंब :
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेनुसार, पात्र शेतकरी कुटुंबाला (पती, पत्नी आणि त्यांची 18 वर्षांखालील मुले) दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी दोन हजार रुपये) दिली जाते. 19 वा हप्ता जानेवारी महिन्यातच जमा होणे अपेक्षित होते, परंतु, मुख्य कार्यक्रमासाठी पंतप्रधानांच्या उपलब्धतेमुळे विलंब झाला.
आतापर्यंतची रक्कम :
आतापर्यंत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी एकूण 18 हप्त्यांमध्ये सुमारे 22 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.