Pimpri-Chinchwad : पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी खुशखबर! आता त्यांना बसमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मागील दरवाजाऐवजी पुढील दरवाज्याचा वापर करता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (PMPML) मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी मंगळवारी (दि. २४) याबाबत आदेश जारी केले आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत दररोज सुमारे ८ ते १० लाख प्रवासी पीएमपी (PMPML) बसने प्रवास करतात. या प्रवाशांमध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि नोकरदार वर्गाचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना पीएमपीकडून सवलतीच्या दरात बस पास दिले जातात. शिवाय, बसमध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येतात. मात्र, अनेकदा या राखीव जागांवर इतर प्रवासीच बसलेले असतात. परिणामी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना बसमध्ये चढताना-उतरताना आणि बसमध्ये जागेसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘आमची पीएमपीएमएल’ ग्रुपच्या सदस्या शैलजा आरळकर यांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने दखल घेत दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना पुढील दरवाजाने प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. बस थांब्यावर उभी राहिल्यानंतर वाहकाने त्यांना राखीव आसनांवर बसण्यासाठी जागा करून द्यावी. तसेच, बस थांब्याजवळ व्यवस्थित उभी करावी, जेणेकरून या प्रवाशांना चढ-उतार करताना त्रास होणार नाही, अशी सूचनाही देण्यात आली आहे. या प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याचे, अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
PMPML | प्रवाशांकडून समाधान व्यक्त-
पीएमपी प्रशासनाच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरोदर महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे त्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
बसमध्ये राखीव आसनांची संख्या-
दिव्यांग: ०२
ज्येष्ठ नागरिक: ०२
महिला: १८
“दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना पुढील दरवाजाने प्रवेश देऊन त्यांच्यासाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश वाहकांना देण्यात आले आहेत. बस थांब्याजवळ व्यवस्थित उभी करण्याची सूचना चालकांना देण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.” – सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल
महत्त्वाच्या बातम्या-
आता तुमच्या घराच्या जवळ मिळणार गंगाजल, तेही फक्त ३० रुपयांत!, कसं ते पाहा…
शेकोटी करत असाल तर सावधान, ‘या’ गोष्टी कराल तर दाखल होऊ शकतो गुन्हा!
‘आमच्या परळीत प्राजक्ता ताई…’; सुरेश धसांनी सगळंच सांगितलं
बीडमध्ये गुन्हेगारीचा महापूर! तब्ब्ल ‘इतक्या’ जणांकडे शस्त्र परवाना?
राज्यावर पावसाचं सावट! ‘या’ तारखेला अवकाळी पावसासह गारपीट होणार?