Pune News l महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने नवा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बसमध्ये महिलांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांविरोधात चालक आणि वाहकांनी तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी, अशा सूचना पीएमपी प्रशासनाने दिल्या आहेत. स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या घटनेनंतर ही कठोर उपाययोजना राबवण्यात आली आहे.
महिला सुरक्षेसाठी पीएमपीने घेतलेले निर्णय:
– बसमध्ये महिलांना त्रास दिल्यास चालकांनी बस थेट पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल करावी.
– पोलिस नियंत्रण कक्ष आणि पीएमपी अपघात विभागाला तात्काळ माहिती द्यावी.
– सर्व बस स्थानकांवर आणि आगारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना.
– बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करावेत.
– रात्री पार्किंग वेळी बसच्या सुरक्षा उपायांचे पालन करावे.
Pune News l स्वारगेट घटनेनंतर पीएमपी प्रशासन सतर्क :
याशिवाय आगारातील स्वमालकीच्या व ठेकेदारांच्या बसमधील CCTV कॅमेरे सुस्थितीत आहेत का, याची देखील पाहणी करावी. तसेच रात्री बस पार्क केल्यानंतर चालकांनी बसचा हँड ब्रेक देखील लावावा, याशिवाय दरवाजे आणि खिडक्या बंद असल्याची खात्री करावी. याबरोबरच गॅरेज सुपरवायझर आणि सुरक्षारक्षकांनी देखील पार्क केलेल्या बसची वेळोवेळी पाहणी करावी.
स्वारगेट बस स्थानकावर महिला प्रवासी अत्याचारप्रकरणानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे पीएमपीने महिला प्रवाशांसाठी अधिक सुरक्षिततेची हमी देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, महिला प्रवाशांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.