धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर संतापाची लाट, कोण काय म्हणाले?

मुंबई | धुळ्याचे 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट पसरलीय. विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. या सरकारचा धिक्कार असो, असं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.

शेतकरीविरोधी सरकारने केलेली ही हत्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, असं ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय.

धर्मा पाटील हे सरकारी अनास्थेचा बळी आहेत. हजारो शेतकऱ्यांनी प्राण गमावल्यानंतरही या सरकारला जाग येत नाही हे संतापजनक असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.

सरकार म्हणजे मायबाप आणि त्याच मायबापाच्या दारात बळीराजाचा बळी घेतला जातोय, अशी उद्विग्न प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलीय.

याशिवाय धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी नेटकऱ्यांनीही सरकारला धारेवर धरलंय.