Prayagraj Mahakumbh 2025 | प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात 29 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत किमान 17 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या अधिक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Prayagraj Mahakumbh 2025)
ही घटना मौनी अमावस्येनिमित्त गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमावर पवित्र स्नानासाठी लाखो भाविक एकत्र आल्याने घडली. गर्दीचा ताण वाढल्याने चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे अनेकजण जखमी झाले आणि काहींचा मृत्यू झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रशासनाला त्वरित मदत आणि वैद्यकीय सहाय्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
या घटनेनंतर प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत. भाविकांना संयम बाळगण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो, ज्यामध्ये कोट्यवधी भाविक सहभागी होतात. अशा मोठ्या गर्दीच्या वेळी प्रशासन आणि भाविकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं भयानक वास्तव
मुंबईहून शाही स्नानासाठी प्रयागराजला आलेल्या सरिता कुरतडकर यांनी या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. त्यांनी नेमकं काय घडलं याबाबत महत्वाची माहिती दिली. (Prayagraj Mahakumbh 2025)
“आम्ही रात्री 1:15 च्या सुमारास संगम तटावर पोहोचलो. तेव्हा अचानक चेंगराचेंगरी सुरू झाली. लोक खाली पडत होते, किंचाळत होते, पण तिथं प्रशासनाचा कुठलाही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.” पुढे त्यांनी प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, “टीव्हीवर आम्हाला सांगितलं होतं की सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षा व्यवस्था आहे, पण लोकांना जीव गमवावा लागतोय, हे त्या कॅमेऱ्यात दिसलं नाही का? पोलिसांचा तिथं कुठेही पत्ता नव्हता.”
घटनास्थळी उशिरा पोहोचलेली मदत
कुरतडकर म्हणाल्या, “चेंगराचेंगरी सुरू झाल्यानंतर जवळपास एक तासानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या. तब्बल दोन तासांनंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली.” प्रशासनाच्या हलगर्जीपणावर त्यांनी रोष व्यक्त करत विचारलं, “जर सुरक्षा व्यवस्था नीट लावली असती, तर एवढी मोठी दुर्घटना टाळता आली असती.” (Prayagraj Mahakumbh 2025)