Priyamani Trolls l अभिनेत्री प्रियामणी (Priyamani) हिने २०१७ मध्ये इव्हेंट मॅनेजर आणि दिग्दर्शक मुस्तफा राज (Mustafa Raj) सोबत आंतरधर्मीय विवाह केला. ‘द फॅमिली मॅन’ वेबसीरिजमुळे हिंदी मनोरंजन विश्वात प्रसिद्धी मिळवलेल्या प्रियामणीला तिच्या वैयक्तिक निर्णयावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. लग्नाच्या सात वर्षांनंतरही तिला आणि तिच्या पतीला सतत टीकेचे धनी बनावे लागत आहे.
साखरपुड्याची गोड बातमी शेअर करताच ट्रोलिंग सुरू :
प्रियामणीने तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. मात्र त्यानंतर काही लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ‘लव्ह जिहाद’चे आरोप लावण्यात आले, तसेच भविष्यात त्यांच्या मुलांना दहशतवादी संघटनेत भरती करण्यात येईल, अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण प्रतिक्रिया तिला मिळाल्या.
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियामणी म्हणाली, “मी इंडस्ट्रीचा भाग असल्याने लोक काहीही बोलतील, याची मला कल्पना आहे. पण माझ्या पतीला, जो या सगळ्याचा भागच नाही, त्याला का लक्ष्य केलं जातं? या ट्रोलिंगमुळे काही दिवस माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता. अजूनही मी सोशल मीडियावर काही पोस्ट करताच बहुतेक कमेंट्स आमच्या धर्माबद्दल असतात.”
Priyamani Trolls l नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करण्याचा धडा :
या सततच्या टीकेनंतरही प्रियामणीने यावर योग्य तो दृष्टिकोन ठेवला आहे. ती म्हणाली, “ट्रोलिंग करणाऱ्यांना उत्तर देणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. त्यामुळे आता मी या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे. हे लोक आपली ओळख लपवून टीका करतात आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना महत्त्व देणं मी बंद केलं आहे.”
प्रियामणीचा हा धक्कादायक खुलासा ऐकून अनेक चाहत्यांनी तिच्या मानसिक ताकदीचं कौतुक केलं आहे. ट्रोलिंगचा सामना करताना तिची सकारात्मकता आणि आत्मविश्वास हेच तिचं खऱ्या अर्थाने मोठं बळ असल्याचं दिसत आहे.