Pune Lok Sabha | भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार होणार? याची उस्तुकता सर्वांना लागली आहे. येथे महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे उभे आहेत. त्यातच एमआयएमने माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी दिल्याने पुण्यात प्रथमच पुणे महापालिकेतील चार माजी नगरसेवकांमध्ये चौरंगी लढत होणारे.
पुण्यात सध्या मुरलीधर मोहोळ यांचं पारडं जड मानलं जातंय. कारण मोहोळ यांनी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पुण्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यांची कामाची पद्धत आणि कामाचा लेखाजोखा हा पुणेकरांना चांगलाच ठाऊक आहे. अशात भाजपच्या उमेदवारासाठी प्रथमच मनसेही मैदानात उतरली आहे.
राज ठाकरेंच्या फतव्यामुळे मोहोळांचं पारडं जड
राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात भाजपला जाहीर पाठिंबा दर्शवला होता. अशात कालच (10 मे) त्यांनी पुण्यात मोहोळ यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. इतकंच नाही तर, मोहोळ यांना भरभरून मत द्या, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलंय. राज ठाकरे यांच्या सभेमुळे मोहोळ यांच्या (Pune Lok Sabha) पारड्यात मतांची भर पडू शकते. राज ठाकरे यांनी “मशिदींमधून हे मौलवी जर फतवे काढत असतील की यांना मतदान करा, मग आज राज ठाकरे तुम्हाला फतवा काढतो. तसेच माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ असतील, शिंदेचे आणि अजित पवारांचे उमेदवार असतील त्यांना मतदान करा.”, असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय.
भाजपकडून दिग्गज नेते पुण्यात तळ ठोकून
या सभेचा सकारात्मक फायदा थेट मोहोळ यांना होऊ शकतो. दुसरीकडे पुण्यात मनसेमधून बाहेर पडलेले वसंत मोरे यांना उमेदवारीसाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. अगोदर ते शरद पवारांच्या संपर्कात होते. मात्र, इथून काय त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्याशीही जवळीक साधली. त्यामध्येही त्यांना यश आलं नाही. शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी मोरे यांना उमेदवारी दिली.
मागील निवडणुकीमध्ये वंचित आणि एमआयएम यांची युती होती. मात्र, यावेळी एमआयएमने देखील पुण्यात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मोरे यांच्यापुढे मत मिळवण्यात आव्हान असणार आहे. काँग्रेसचं पाहायला गेलं तर, अगोदर उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी झाल्या. धंगेकर यांच्या उमेदवारीला माजी उपमहापौर आबा बागुल, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी विरोध केला होता. नंतर ही नाराजी दूर करण्यात धंगेकर यांना यश आलं. मात्र मोहोळ यांच्यापुढे धंगेकर यांनाही जोर लावावाच लागणार आहे.
पुणे हा मतदारसंघ तसा काँग्रेसच्या ताब्यात राहिलेला आहे. मात्र, नंतर 1991 च्या निवडणुकीत अण्णा जोशी यांच्या माध्यमातून भाजपचा पहिला खासदार इथून निवडून आला. आता पुण्यात (Pune Lok Sabha) मोहोळ, धंगेकर, मोरे आणि सुंडके हे चार महापालिकेचे माजी नगरसेवक उभे राहिले आहेत. या लोकसभेसाठी पुण्यात कॉँग्रेस आणि भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जातंय.
काँग्रेसविरोधात भाजप गड राखणार?
भाजपाकडून इथे अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. खासदार राहुल गांधी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सुनील केदार यांच्यासह डझनभर आमदार पुण्यात तळ ठोकून आहेत. यासोबतच शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.
तर, दुसरीकडे (Pune Lok Sabha) भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं आहे. मोहोळ यांना मनसेचा पाठिंबा मिळाला असला तरी भाजप काँग्रेसला कमी समजणार नाही. आता यांच्यातून कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.
News Title – Pune Lok Sabha Election 2024 Muralidhar Mohol
महत्त्वाच्या बातम्या-
“राज ठाकरेंना आताच एवढा पुळका का?, भाजपची राज ठाकरेंनाही धमकी?”
पुढील चार दिवस धोक्याचे; पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट
प्रज्वल रेवन्नानंतर भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, राजकारणात खळबळ
कंड जिरवेन म्हणणाऱ्या अजित पवारांना निलेश लंकेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
ट्विटर X च्या माध्यमातून लाखो रुपये कमवता येणार; एलॉन मस्क यांची नवी घोषणा काय?