Pune Metro l पुण्यात उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी, तसेच आरामदायी प्रवासासाठी पुणेकर मेट्रोला प्राधान्य देत आहेत. रिक्षा किंवा कॅबपेक्षा मेट्रोचा प्रवास अधिक सोयीचा आणि सुखकर असल्याने प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
मेट्रो प्रवाशांची संख्या आणि महसूल वाढ :
पुणे मेट्रोची (Metro) सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात केवळ हौस म्हणून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र, आता रामवाडी ते वनाझ आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवडपर्यंत मार्ग सुरू झाल्याने मेट्रोतून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे.
मागील वर्षी (२०२४) मार्च महिन्यात २२ लाख प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला, ज्यामुळे प्रशासनाला साडेतीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. डिसेंबर २०२४ मध्ये सर्वाधिक ४६ लाख ९४ हजार प्रवाशांनी प्रवास केला आणि त्यातून ७ कोटी ३८ लाखांचा महसूल जमा झाला. फेब्रुवारी २०२५ मध्ये ४३ लाख प्रवाशांनी प्रवास केला आणि ६ कोटी ७३ लाखांचा महसूल मिळाला.
Pune Metro l मेट्रोचे फायदे :
आरामदायी आणि सुखकर प्रवास
उकाड्यापासून सुटका
वाढती प्रवासी संख्या
प्रशासनाला मिळणारा वाढता महसूल
प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता :
सध्या दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाखांच्या वर गेली आहे. अद्याप शहरभर संपूर्ण भागात मेट्रो पोहोचलेली नाही. त्यामुळे, भविष्यात सर्व भागात मेट्रो मार्ग झाल्यावर पुणेकर मेट्रोचाच वापर करतील. परिणामी, रस्त्यांवरील ताण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गणेशोत्सव, नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि २६ जानेवारी यांसारख्या विशेष दिवशी मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. यावर्षी मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे, प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
एका प्रवाशाचा अनुभव :
“मी सध्या पुण्यात आलो आहे आणि मेट्रोमधून प्रवास केला. मी युरोपमध्येही प्रवास केला आहे आणि तेथील मेट्रोपेक्षा पुण्याची मेट्रो अत्यंत चांगली आहे. त्यामुळे मला या गोष्टीचा अभिमान वाटला,” असे प्रा. डॉ. अरविंद गंगोली राव, प्रमुख, एरोस्पेस इंजिनिअरिंग, नेदरलँड यांनी सांगितले.