Pune News : स्वारगेट (Swargate) बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी पहाटे घडलेल्या या अमानुष प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (Dattatraya Ramdas Gade) याचा शोध घेण्यासाठी आठ पोलिस पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांचा संताप: आरोपीला कठोर शिक्षा हवी
अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, पोलिसांना तक्रार मिळताच तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे. “सीपींसोबत (Police Commissioner) माझे बोलणे झाले आहे. आरोपी हा शिरूर तालुक्यातील असल्याची माहिती आहे. एका संशयिताला ताब्यात घेतले आहे, मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांकडून शिरूर आणि त्याच्या गावी शोधमोहीम सुरू आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
“या घटनेने मला अतिशय मनस्ताप झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हे असह्य आहे. आरोपी कोणत्याही परिस्थितीत सापडला पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” असे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले.
तपास जलदगतीने करण्याचे आदेश
पुण्यासारख्या मोठ्या शहरात आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा घटना घडणे हे गंभीर असल्याचे सांगत अजित पवार यांनी सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “स्वारगेट आणि शिवाजीनगर डेपो हे वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, त्यामुळे सुरक्षा अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले जात असून, आरोपीचा मागोवा घेतला जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
लवकरात लवकर न्याय मिळणार
अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या प्रकरणात पोलिसांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या मुलीवर हा अन्याय झाला आहे, तिच्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. आरोपी सापडताच त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई केली जाईल आणि हा खटला जलदगतीने चालवून दोषींना कठोर शिक्षा देण्याचे प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर पुण्यात नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारवर आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणात आरोपीला लवकर अटक होते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.