पंधरा दिवसांमध्ये दुसरी घटना; भरधाव पिकअपने उडवल्या अनेक गाड्या

Pune News | पुणे शहरात अपघातांचं सत्र सुरूच आहे. भरधाव वाहनांमुळे अपघात होत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच पुणे शहरातील चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात झाला होता. (Pune News)

एका भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली होती. या अपघातात १० ते १५ जण जखमी झाले होते तर एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये असाच एक विचित्र अपघात घडला आहे. एका बेफाम पिकअप चालकाने अनेक वाहनांना उडवले आहे.

शुक्रवारी दुपारी १२:३० च्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे-पुनावळे रस्त्यावर हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या पिकअपने आधी उजव्या बाजूने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला समोरासमोर धडक दिली.

या जोरदार धडकेत पिकअपचे चाक निखळले आणि चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींनाही या पिकअपने धडक दिली.

सुदैवाने जीवितहानी नाही, महिला जखमी

ताथवडे-पुनावळे रस्त्यावर झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. चालकाने मद्यपान केले होते, असा स्थानिकांचा आरोप आहे. वाकड पोलिसांनी या बेजबाबदार चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Pune News)

१६ जानेवारी रोजी पुण्यातील चाकण-शिक्रापूर रस्त्यावर असाच भीषण अपघात झाला होता. एका भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली होती. त्या अपघातात १० ते १५ जण जखमी झाले होते तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये तसाच अपघात घडला आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Title : Pune News Pimpri Chinchwad Accident CCTV Footage