Pune News | पुणे पोलिसांनी बेशिस्त वाहनचालक आणि सोनसाखळी चोरांना चाप लावण्यासाठी सोमवारी शहरात विक्रमी नाकाबंदी केली. एकाच दिवशी, प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून 1,518 वाहनांवर कारवाई करण्यात आली, तसेच 371 वाहने जप्त करण्यात आली आणि 13 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. (Pune News)
विक्रमी नाकाबंदी
शहरात दररोज पादचारी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच, दुचाकीवर ट्रीपल सीट जाणे, ‘नो-एंट्री’तून प्रवास करणे, बेदरकार वाहने चालविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी (Pune Police) सोमवारी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत 38 ठिकाणी, अर्थात, जवळपास सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केली होती.
कारवाईचा तपशील
या नाकाबंदीदरम्यान शहरातील एकूण 78 महत्त्वाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग (Barricading) केले होते. यावेळी 4,187 वाहने तपासण्यात आली. रॉग साइड ड्रायव्हिंग (Wrong Side Driving), दुचाकीवर ट्रीपल सीट (Triple Seat), कारमध्ये सीटबेल्ट (Seat Belt) परिधान न केलेल्या वाहनचालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1,518 वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 13 लाख 65 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला. यात स्थानिक पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा आणि वाहतूक पोलिसांचे पथकही पाहणीसाठी नेमले होते.
पोलिसांचे आवाहन
“कायदेशीर पडताळणी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.” असे आवाहन
रंजनकुमार शर्मा, पोलिस सहआयुक्त (Ranjankumar Sharma, Joint Commissioner of Police) यांनी केले आहे.
मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त
‘एकाच दिवशी सबंध पोलिस यंत्रणा रस्त्यावर उतरून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करील,’ असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar) यांनी यापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सोमवारी त्यावर कार्यवाही केली. चार अतिरिक्त आयुक्त, पाच उपायुक्त, 10 सहायक आयुक्त, 39 पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे निरीक्षक, तपास पथकातील अधिकारी, चौकी अधिकारी, वाहतूक शाखा आणि गुन्हे शाखेचे अधिकारी असे मिळून एकूण 97 अधिकारी आणि 1,872 पोलिस अंमलदार रस्त्यावर उतरले होते. (Pune News)
Title : Pune News Police Conduct Record Blockade 13 Lakh Recovered