Pune | मागील काही दिवसांपासून पुण्यात जीबीएस (GBS) अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत पुण्यात जीबीएसचे एकूण 74 रुग्ण आढळले आहेत. यातील 14 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत, तर पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. पुण्यात (Pune) जीबीएसचे वाढते रुग्ण पाहता महानगर पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पुण्यातील गुईलेन बॅरे सिंड्रोमचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.
महापालिकेचा मोठा निर्णय-
यानंतर आता महानगर पालिकेने जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. GBS आजारावर पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. आतापर्यंत रुग्णांना स्वखर्चाने उपचार करावे लागत होते. यामुळे खिशाला मोठा भुर्दंड बसत होता. शिवाय, खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात होते. रुग्णांची होणारी ही हेळसांड पाहता महानगर पालिका प्रशासनाने जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
खासगी रुग्णालयांवर महापालिकेचे लक्ष-
यासाठी पुणे (Pune) महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 50 सामान्य बेड आणि 15 आयसीयू युनिट (ICU Units) आरक्षित करण्यात आले आहेत. याबाबत पुणे महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची थोड्या वेळात बैठक घेणार आहेत. याशिवाय ज्या खासगी रुग्णालयात जीबीएसचे रुग्ण आहेत, त्यावरही महापालिकेचे लक्ष असणार आहे. संबंधित रुग्णालयात महापालिकेकडून मेडिकल ऑफिसरची नियुक्ती केली जाणार आहे.
जीबीएसचे रुग्ण दाखल असलेल्या नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ हॉस्पिटल (Deenanath Hospital) अशा हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून किती बिल घेतले जाते, यावर हे मेडिकल ऑफिसर लक्ष ठेवणार आहेत. रुग्णांकडून जास्तीचे पैसे आकारले तर त्यांच्यावर कारवाई (Action) देखील होणार असल्याची माहिती सूत्रांकडून (Sources) देण्यात आली आहे.
सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) नांदेडगाव (Nandedgaon), किरकटवाडी (Kirkatwadi) परिसरात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. या परिसरात महापालिका सावधगिरीने पावले उचलत असून परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा (Supply of Pure Water) केला जाणार आहे.
GBS पहिला बळी –
दरम्यान, याच आजाराने बाधित (Affected) एका तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण डीएसके विश्वमध्ये वास्तव्यास होता. तो मूळचा सोलापूरचा होता, पण काही काळापासून पुण्यात राहत होता. या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुलियन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. GBS मुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो तरुण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेरही आला होता.