Kondhwa Rape Case | कोंढवा परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर पुणे शहरात भीतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. “पुण्यात महिला सुरक्षित नाहीत,” अशा स्वरूपाचे फेक नॅरेटिव्ह समाजमाध्यमांवर पसरवले गेले. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवघ्या २४ तासांत सत्य समोर आणणाऱ्या पुणे पोलिसांनी आता स्पष्ट इशारा दिला आहे – खोटी अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, “कोंढवा प्रकरणात पीडितेने दिलेली तक्रार खोटी होती. तपासात असे समोर आले की, तिने ज्या तरुणावर बलात्काराचा आरोप केला, तो प्रत्यक्षात तिचाच जुना ओळखीचा मित्र होता. त्यांचं नातं वैयक्तिक होतं आणि त्या दिवशी आरोपी तिच्याच बोलावण्यानं तिच्या घरी गेला होता.”
“महिला सुरक्षित नाही” हे खोटं नॅरेटिव्ह – पोलिसांचा खुलासा :
आयुक्तांनी पुढे सांगितले की, “या प्रकरणामुळे पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. काही लोकांनी समाजमाध्यमांवरून पुण्यातील महिलांबाबत भीतीदायक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही २४ तासांच्या आत सत्य समोर आणलं. आता अशा अफवा पसरवणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही.”
तपासात असंही समोर आलं आहे की, तरुणीने ज्या फोटोवरून आरोप केला, तो सेल्फी तिच्या मोबाईलमधून आणि तिच्याच संमतीने काढण्यात आला होता. त्यावरील मजकूरही तिनेच एडिट करून लिहिला होता. तसेच, घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा स्प्रे किंवा इतर हल्ल्याचा पुरावा मिळाला नाही.
Kondhwa Rape Case | सीसीटीव्ही, मोबाईल तपास आणि कबुलीने उघड झाला खोटा आरोप :
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे तपासून स्पष्ट केलं की, आरोपी तरुण सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोसायटीत दाखल झाला होता आणि रात्री पावणेनऊला बाहेर पडला होता. पोलिसांनी त्याचा फोटो पीडितेला दाखवला असता तिने ओळख नाकारली, पण त्याआधी ती स्तब्ध झाली आणि उलट “हा फोटो तुम्हाला कुठून मिळाला?” असा प्रश्न तिने पोलिसांना विचारला होता – त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला.
तपासात हेही समोर आलं की, दोघांची ओळख समाज मेळाव्यात झाली होती आणि गेल्या वर्षभरात त्यांच्यात सतत संपर्क होता. आरोपी एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.
“पुणे पोलिस कार्यक्षम, अफवांना बळी पडू नका” – आयुक्तांचे आवाहन :
आयुक्त अमितेश कुमार यांनी जनतेला आवाहन केलं की, “पुणे शहर पोलिसदल अत्यंत दक्ष आणि कार्यक्षम आहे. कोणीही चुकीचा प्रचार करून शहराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करू नये. जनतेच्या सहकार्याने आणि विश्वासानेच आम्ही कायदा-सुव्यवस्थेला अधिक बळकट करणार आहोत.”