Dattatraya Gade Arrested l पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर अटक करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील एका शेतात लपून बसलेल्या गाडे याला 72 तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. या शोध मोहिमेत 13 पोलिस पथकांचा समावेश होता, तसेच डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला.
दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या! :
37 वर्षीय दत्तात्रय रामदास गाडे याला गुरुवारी रात्री दीड वाजता अटक करण्यात आली. तो रात्री उशिरा एका नातेवाईकाच्या घरी जेवणासाठी गेला होता, जिथे त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि पोलिसांसमोर शरण जाण्याची इच्छा व्यक्त केली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. गाडे याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गुन्हे दाखल असून, 2019 मध्ये तो जामिनावर सुटला होता.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 13 पथकांची स्थापना केली होती. तसेच, आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गावात 100 पोलिसांचा बंदोबस्त ठेवून, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली. गाडे याला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही घटना मंगळवारी पहाटे 5.45 वाजता घडली होती. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात बसची वाट पाहत असलेल्या 26 वर्षीय तरुणीवर गाडे याने बलात्कार केला. त्याने पीडितेला ‘दीदी’ म्हणत दुसऱ्या बसकडे नेले आणि तिथे उभ्या असलेल्या ‘शिवशाही’ बसमध्ये हे कृत्य केले. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला होता.
गाडे याच्या अटकेनंतर, पोलिसांनी त्याला लष्कर पोलिस ठाण्यात आणले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर, त्याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.