‘पीएनबी’ला ११ हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या मोदीचं देशाबाहेर पलायन

मुंबई | पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटी रुपयांचा गंडा घालणारा हिरे व्यापारी नीरव मोदीने देशातून पलायन केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांनी अद्याप या माहितीला दुजोरा दिलेला नाही. 

पंजाब नॅशनल बँकेकडून या घोटाळ्याप्रकरणी 2 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी देखील सुरु केलीय. अंमलबजावणी संचालनालयानेही याप्रकरणी नीरव मोदीविरोधात गुन्हा दाखल केलाय. 

दरम्यान, कारवाई होणार असल्याचं दिसताच नीरव मोदीने देशाबाहेर पलायन केल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने दिलंय. नीरव मोदी आपल्या कुटुंबियांसह स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये गेल्याचं या वृत्तात म्हटलंय.