Metro Ticket l हिंजवडी-शिवाजीनगर (Hinjawadi-Shivajinagar) मेट्रोच्या स्वयंचलित तिकीट यंत्रणेचे (Automatic Fare Collection – AFC) काम ‘डेटामेटिक्स’ (Datamatics) कंपनीतर्फे केले जाणार असून, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) (Maha Metro) दोन मार्गिकांसोबत समन्वय कसा साधणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.
‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’च्या (National Common Mobility Card – NCMC) धर्तीवरच स्वयंचलित तिकीट यंत्रणा विकसित केली जाणार असून, प्रवाशांना कार्ड व ‘क्यूआर कोड’ (QR Code) द्वारे तिकीट काढण्याची सुविधा असेल.
हिंजवडी-शिवाजीनगर (Hinjawadi-Shivajinagar) मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. मार्च 2025 पर्यंतच्या मुदतीत हे काम पूर्ण होणार नसले, तरी ते येत्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने या मेट्रोच्या सर्व 23 स्थानकांवर प्रवाशांकरिता स्वयंचलित तिकीट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्याचे काम नुकतेच ‘डेटामेटिक्स’ (Datamatics) या कंपनीला देण्याचे जाहीर करण्यात आले. ‘मुंबई मेट्रो (Mumbai Metro), कोलकाता मेट्रो (Kolkata Metro), लखनौ मेट्रो (Lucknow Metro), दिल्ली-मेरठ आरआरटीएस (Delhi-Meerut RRTS) या देशातील महत्त्वाच्या प्रकल्पांनंतर आता पुणे मेट्रोसोबत (Pune Metro) तिकीट यंत्रणेचे काम करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे,’ अशी माहिती ‘डेटामेटिक्स’चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कनोडिया (Rahul Kanodia) यांनी दिली.
पुण्यातील इतर मेट्रो प्रकल्पांसोबत समन्वय साधून प्रवाशांना मेट्रो मार्ग सहज आणि सुलभ अदलाबदल करता यावा, या दृष्टीने तिकीट यंत्रणेची रचना केली जाईल, असा दावा त्यांनी केला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) (PMRDA) सार्वजनिक-खासगी भागीदारी स्वरूपात (पीपीपी) (PPP) विकसित केल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे काम ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’तर्फे (Pune IT City Metro) केले जात आहे. या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी मार्च 2025 ऐवजी आता सप्टेंबर 2025 ची नवी मुदत देण्यात आली आहे.
Metro Ticket l दोन ठिकाणी यंत्रणेत बदल :
जिल्हा न्यायालय (District Court) आणि शिवाजीनगर (Shivajinagar) या दोन मेट्रो स्थानकांमध्ये महामेट्रो (Maha Metro) आणि हिंजवडी मेट्रोच्या (Hinjawadi Metro) प्रवाशांना मेट्रो अदलाबदल करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी एकाच कार्डद्वारे प्रवेश करता येणार, की वेगळ्या मेट्रोसाठी वेगवेगळी कार्डे वापरावी लागणार, याबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे. दोन्ही मेट्रोमध्ये योग्य समन्वय साधला जाईल, असा दावा महामेट्रो (Maha Metro) आणि ‘पीएमआरडीए’ (PMRDA) प्रशासनाकडून केला जात असला, तरी ही संपूर्ण तिकीट यंत्रणा राबविणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने तोडगा कसा काढणार, हे कोणीही स्पष्ट केलेले नाही.
“महामेट्रो आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (Hinjawadi to Shivajinagar Metro) मार्गिकांद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका मेट्रोतून दुसरीकडे जाताना सहज आणि सुलभ व्यवस्था निर्माण करून देणे आवश्यक आहे. या संदर्भात दोन बैठका झाल्या आहेत. जिल्हा न्यायालय आणि शिवाजीनगर या दोन स्थानकांवर अशा स्वरूपाची ‘कनेक्टिव्हिटी’ निर्माण करायची आहे. ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ने (Pune IT City Metro) संचालक मंडळाच्या बैठकीत तिकीट यंत्रणा राबविण्यासाठी कंत्राटदाराची निवड केली आहे. त्यानुसार पुढील नियोजनासाठी महामेट्रोसोबत (Maha Metro) आणखी बैठका घेण्यात येतील.”
– रिनाझ पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए (PMRDA)