Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. त्यांनी थेट अलिबाग शहरासह तालुक्याचं नामकरण करण्यात यावं असं पत्रात म्हटलं आहे. अलिबागचं नाव बदलून ‘मायनाक नगरी’ ठेवण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
त्यामुळे उस्मानाबाद, औरंगाबाद या शहरांपाठोपाठ आता अलिबाग शहराचंही नाव बदलण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मागणीला अलिबाग शहरामधून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल.
लोकसभा निवडणुका तोंडावर असताना ही मागणी करण्यात आल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. अलिबागचे नाव बदलण्यासोबतच इथे एक भव्य स्मारक उभारावं, असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे राजकारणात सध्या या पत्राची चर्चा रंगली आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत सागरी संरक्षण आणि सागरी मोहिमांना अतिशय महत्त्व आहे. महाराजांनी दूरदृष्टीने बलाढ्य आरमाराची उभारणी केली. कोकणातील भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे मायनाक भंडारी या शूर लढवय्याकडे त्यांनी समुद्रमार्गे स्वराज्याला धोका उद्भवल्यास सागरी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती.
अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांनादेखील माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे ‘मायनाक नगरी’हे नामकरण करावे, असं विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.
अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सहसचिव वैभव तारी आणि प्रवक्ते शशांक पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधानसभेचे अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन ही मागणी केली.याबाबतचे निवेदन या शिष्टमंडळाने नार्वेकर यांना सादर केले. सदर मागणी अतिशय रास्त असून, त्याची शासन स्तरावरून उचित दखल घेण्यात यावी आणि नामकरण, स्मारक उभारणी याद्वारे या मागणीची पूर्तता व्हावी, अशी शिफारस राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
News Title – Rahul Narvekar demand to change the name of Alibaug
महत्त्वाच्या बातम्या-
ठाकरेंबरोबर वाजलं, पण आंबेडकरांचा शरद पवार गटाला पाठिंबा, घेतला मोठा निर्णय
‘त्या’ चर्चा खऱ्या ठरल्या; अभिनेत्रीच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर
PPF खातेधारकांनो ‘या’ गोष्टीकडे लक्ष द्या, अन्यथा होऊ शकते लाखोंचे नुकसान
धमाकेदार फीचर्ससह Skoda Superb पुन्हा मैदान गाजवण्यास सज्ज; जाणून घ्या किंमत
आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार