Raj Thackeray and Sonali Bendre l महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या विशेष सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत व्यक्तींनी उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar), गायिका आशा भोसले (Asha Bhosale), अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आणि शर्वरी वाघ (Sharvari Wagh) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, सोनाली बेंद्रे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जवळपास ३० वर्षांनंतर भेट झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आले असून, सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
३० वर्षांपूर्वीचा आठवणींचा धागा :
१९९६ साली मुंबईत पहिल्यांदा जागतिक पॉपस्टार मायकल जॅकसन (Michael Jackson) याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य सोहळ्यात राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकत्र दिसले होते. त्यानंतर ३० वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमात दोघेही एकत्र आले. या क्षणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) देखील उपस्थित होत्या. सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यात आजही चांगली मैत्री असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सोनाली बेंद्रे, शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात गप्पा सुरू असल्याचे दिसते. अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या काव्य वाचन सोहळ्यात सोनालीने आपल्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
व्हिडीओमध्ये सोनाली, शर्वरी वाघ, जावेद अख्तर आणि इतर मान्यवर व्यासपीठाकडे जात असताना, सोनालीने राज ठाकरेंकडे बोट दाखवून काहीसं हसत संवाद साधल्याचे दिसून आले. हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
सोनाली बेंद्रेने केले मराठीत भाषण :
या कार्यक्रमात सोनाली बेंद्रेने मराठीत भाषण देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तिने आपल्या भाषणात सांगितले, “मी स्वतःला अस्सल महाराष्ट्रीयन म्हणायला थोडीशी संकोचते, कारण माझा जन्म जरी महाराष्ट्रात झाला असला तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझे बालपण वेगवेगळ्या राज्यांत गेले. आम्ही अनेकदा राहण्याचे ठिकाण बदलले, मात्र आमच्या घरात मराठी संस्कृती कायम जपली गेली.” तिने पुढे सांगितले, “कुठेही राहिलो तरी घरात मराठीतच बोलायचं हे ठरलेलं होतं. त्यामुळे १००% महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरी मराठी ही माझ्यासाठी घरासारखी आहे.”