Raj Thackeray | आज (17 जुलै) आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात मोठ्या भक्तीभावाने विठ्ठलाची पूजा केली जात आहे. पंढरपुरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत विठ्ठलाच्या चरणी हात जोडून प्रार्थना केली. राजकीय नेत्यांकडून सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
आज आषाढी एकादशीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भविकांना शुभेच्छा दिल्या. तसंच महाराष्ट्रात पसरत चाललेलं जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे, अशी प्रार्थना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विठ्ठलाच्या चरणी केली आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट जशास तशी
आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली 8 शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात.
आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण… pic.twitter.com/g96HCoGfK1
— Raj Thackeray (@RajThackeray) July 17, 2024
“महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा..”
निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं.
देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. (Raj Thackeray)
“राज्यात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत..”
पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. जेंव्हा अगदी 7, 8 वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही. (Raj Thackeray)
म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
News Title – Raj Thackeray post in discussion
महत्त्वाच्या बातम्या-
“शरद पवारांपुढं शकुनी मामाही फेल, मराठा समाजाला त्यांनी खूप फसवलं”
बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा 10 हजार, ‘लाडका भाऊ योजने’साठी ‘असा’ करा अर्ज
अजितदादा गटातील तब्बल ‘इतके’ नगरसेवक शरद पवार गटात जाणार; यादी आली समोर
“थोडी तरी लाज असेल तर नरेंद्र मोदींनी..”; काश्मीरमधील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत संतापले
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा