बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं; ऋषी कपूर यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होतो”

मुंबई | अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतल्या एच. एन. रूग्णालयात काल त्यांना प्रकती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचं आज उपचारादरम्यान निधन झालं आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्यांना आदरांजली वाहत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील त्यांना आदरांजली वाहिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऋषी कपूर यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे म्हणतात, “यश-अपयशाच्या चौकटी मोडून जे स्वतःला आवडेल, योग्य वाटेल तसं वागणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपट माध्यमावर कमालीचं प्रेम असणारे दोन नट एका मागोमाग हे जग सोडून गेले ह्यासारखी दुःखाची बाब नाही. हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला वहिला ‘चॉकलेट बॉय’ म्हणजे ऋषी कपूर. 1973 साली बॉबी चित्रपटातून ऋषी कपूर ह्यांनी पदार्पण केलं. तो काळ बंडखोरीचा काळ होता. अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन, मर्दानी देखणा विनोद खन्ना, रसिकांना घायाळ करण्याची अदाकारी असलेला राजेश खन्ना, दमदार संवादफेकीचं कौशल्य लाभलेला शत्रुघ्न सिन्हा, बलदंड धर्मेन्द्रजी आणि चतुरस्र संजीव कुमार ह्यांचा तो काळ होता. ह्या झंझावातात ऋषी कपूर ह्यांनी पदार्पण केलं. स्वप्नाळू पण बंडखोर तरुण-तरुणींचा ते नायक म्हणून त्यांनी स्वत:चं स्थान निर्माण केलं आणि टिकवलं.”

“ऋषी कपूर ह्यांनी अनेक चित्रपटात त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या आणि तेंव्हाच्या सुपरस्टार्ससोबत काम केलं पण कॅमऱ्यासमोरचा सहज वावराचा कपूर घराण्याचा वारसा त्यांच्याकडे आला होता त्यामुळे ते कधीच कुठल्याच सिनेमात दुय्यम वाटले नाहीत. त्यांचा अभिनय इतका सहज असे की असं वाटायचं की जणू काही त्यांच्यासमोर कॅमेराच नाहीये. रंगभूमीवरील अभिनेत्याची ताकद आणि चित्रपट माध्यमात आवश्यक असलेली सहजता ह्यांचा सुरेख संगम त्यांच्या अभिनयात आढळत असे. त्यामुळेच समकालीन दिग्गजांच्या स्पर्धेतही ते स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करून स्वत:चे चित्रपट स्वबळावर यशस्वी करू शकले.”

“2000 च्या आसपास आधीच्या पिढीतील अभिनेते हळूहळू मागे पडत होते पण ऋषी कपूर हे टिकून राहिले. विनोदी भूमिका करताना त्यांनी कधी अंगविक्षेप केले नाहीत आणि चरित्र भूमिका करताना कधी अतिनाट्यमयता येऊ दिली नाही. त्यांचं सिनेमांवरचं प्रेम तितकंच अबाधित राहिलं आणि त्यामुळेच २०२० मधील एखाद्या तिशीतल्या नवोदित लेखकालासुद्धा सिनेमा लिहिताना ऋषीजीच डोळ्यासमोर दिसत राहिले.”

“ऋषी कपूर ह्यांच्याशी माझा कौटुंबिक स्नेह होता, आणि अर्थात त्यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होतो. सामाजिक, राजकीय आणि व्यवसायाशी संबंधित घडामोडींबाबत ते अतिशय मोकळेपणाने आणि समर्पक शब्दांत व्यक्त होत. त्यांचा स्वभाव त्यांच्या ‘ट्विट्स्’मधून दिसायचा. जे मनात तेच ओठावर आणि तेच ‘ट्विटर’वर असा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या एखाद्या ‘ट्वीट’वर कितीही वादंग माजलं तरी ते मागे हटायचे नाहीत तसंच एखाद्या विषयावर भूमिका घ्यायला घाबरायचे नाहीत. चित्रपट कलेवर कमालीचं प्रेम असणारा आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ह्या अफाट ताकदीचा अभिनेत्याचं भारतीय चित्रपट सृष्टीतील स्थान अढळ राहील. ऋषी कपूर ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.”

ट्रेंडिंग बातम्या-

“मरणाच्या उंबरठ्यावर असतानाही डॉक्टर, नर्सेस यांना हसवलं”

ऋषी कपूर यांच्या अखेरच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी उडवली होती टीकेची झोड; पाहा काय होतं ‘ते’ ट्विट

महत्वाच्या बातम्या-

“ऋषी कपूर म्हणजे प्रतिभा संपन्नतेचे शक्तीस्थळ”

लॉकडाऊन नंतर ‘या’ गोष्टीची मला चिंता वाटते- शरद पवार

शून्य संख्येनंतरच लॉकडाऊन उघडला जाईल हा विचार अशक्य- रघुराम राजन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More