Sonam Raghuvanshi | राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. हनिमूनदरम्यान मेघालयमध्ये राजाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत पत्नी सोनमसह (Sonam Raghuvanshi) आठ जणांना अटक झाली आहे. पोलिसांचा तपास सुरु असतानाच आता सोनमकडे दोन मंगळसूत्र सापडल्यामुळे नवा संशय निर्माण झाला आहे.
या दोन मंगळसूत्रांपैकी एक राजा रघुवंशीने (Raja Raghuvanshi) विवाहाच्या वेळी दिलं होतं, तर दुसरं मंगळसूत्र तिचा प्रियकर राज कुशवाह याने दिलं होतं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी सोनम ज्या ठिकाणी लपली होती त्या फ्लॅटमधून ही मंगळसूत्रं जप्त केली आहेत. त्यामुळे सोनमने दुसऱ्या व्यक्तीशी गुप्तपणे लग्न केलं होतं का, याचा तपास पोलिस घेत आहेत.
रघुवंशी कुटुंबाने सुमारे 16 लाख रुपयांचे दागिने दिले :
राजाच्या मोठ्या भावाने सांगितले की, राजा आणि सोनमच्या लग्नात रघुवंशी कुटुंबाने सुमारे 16 लाख रुपयांचे दागिने दिले होते. या दागिन्यांचा तपासही सुरू आहे. राजाच्या हत्येनंतर सोनमची काळी बॅग चोरणाऱ्या शिलोम जेम्सने दिलेल्या माहितीनुसार, रतलाम येथून काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी हस्तगत केले.
या प्रकरणात जेम्सवर हत्येचे पुरावे लपवण्याचा व नष्ट करण्याचा आरोप आहे. त्याच्यावरही अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही की जप्त केलेले दागिने हे रघुवंशी कुटुंबाचेच आहेत की इतर कोणी दिलेले आहेत. (Sonam Raghuvanshi)
Sonam Raghuvanshi | सोनमच्या सांगण्यावरून राजा दागिने घालून गेला? :
राजाचा भाऊ विपिनने सांगितले की, “राजा जेव्हा हनिमूनसाठी मेघालयला गेला, तेव्हा तो सोन्याची चैन आणि अंगठी घालून गेला होता. त्यावेळी आईने त्याला फोन करून विचारलं होतं की, इतके महागडे दागिने घेऊन तू का चाललास? त्यावर राजा म्हणाला की, ‘सोनमने सांगितलं म्हणून मी ते घातले.'”
ही बाब महत्त्वाची ठरते कारण, दागिन्यांच्या आधारेच पोलिस आणखी पुरावे गोळा करत आहेत. विशेष म्हणजे सोनमकडे दोन मंगळसूत्र असल्याने तिच्या वैवाहिक नात्याबाबत संशय अधिकच गडद होत आहे.
मे 23 ला हत्या, अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या :
23 मे 2025 रोजी राजा रघुवंशीची (Raja Raghuvanshi) निर्घृण हत्या झाली. या प्रकरणात सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाह, आणि त्याचे तीन मित्र विशाल चौहान, आकाश राजपूत, आणि आनंद कुर्मी – यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय हत्येचे पुरावे लपवणाऱ्या जेम्ससह आणखी तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणातील तपास वेगाने पुढे जात असून, राजा रघुवंशीच्या हत्येचं नेमकं कटकारस्थान कोणत्या पातळीवर रचलं गेलं होतं, याचा शोध घेतला जात आहे. सोनमचे मंगळसूत्र, दागिने, आणि तिचे वैयक्तिक संबंध यावरून तपासाची दिशा आणखी खोलवर जाण्याची शक्यता आहे.