Maharashtra l राज्यातील राजकारणात (Maharashtra politics) पुन्हा एकदा भूकंप घडवणाऱ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षांपुढे नवे आव्हान उभं करण्यासाठी राजू शेट्टी (Raju shetti, बच्चू कडू (Bachchu kadu) आणि महादेव जानकर (Mahadev jankar) हे तीन बडे नेते एकत्र आले आहेत. या नव्या राजकीय आघाडीचा प्रथम मेळावा येत्या रविवारी पुण्यात ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ च्या माध्यमातून होणार आहे.
महाविकास आघाडीची कमकुवत बाजू भरून काढणार? :
राज्यात मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते. त्यामानाने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष – शिवसेना (उबाठा), शरद पवार (Sharad pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस – हे अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. त्यांच्या मिळूनही ५० आमदारांचे संख्याबळ गाठता आले नाही. त्यामुळे प्रभावी विरोधकांची कमतरता जाणवत असताना, ही नवी आघाडी विरोधकांची जागा भरण्यास सज्ज होत असल्याचे चित्र आहे.
Maharashtra l ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ ची घोषणा :
“खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार!” या टॅगलाइनखाली होणाऱ्या परिषदेत, सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकले जाणार आहे. पुण्यात होणाऱ्या या मेळाव्यात तिन्ही नेते सत्ताधाऱ्यांच्या धोरणांचा खरपूस समाचार घेण्याची शक्यता आहे. यामधूनच या तिघांच्या नव्या राजकीय आघाडीचा पाया रचला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
राजू शेट्टी (Raju shetti) हे शेतकरी संघटनांचे मजबूत नेतृत्व मानले जातात, बच्चू कडू यांचा ग्रामीण भागात ठसा आहे, तर महादेव जानकर (Mahadev jankar) यांचा ओबीसी मतदारांवर प्रभाव आहे. त्यामुळे ही तिघांची आघाडी केवळ राजकीय दबावाचा भाग ठरणार की स्थायी पर्याय बनेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.