Rashmika Mandanna l अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसुबाई भोसले (Yesubai Bhosale) यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना, अभिनेत्री मात्र नव्या वादात सापडली आहे. बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास तिने नकार दिल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे चाहत्यांसह काही राजकीय नेत्यांनीही रश्मिकावर निशाणा साधला आहे. कर्नाटक काँग्रेसचे आमदार रवी गनिगा (Ravi Ganiga) यांनी या प्रकरणात तिच्यावर गंभीर आरोप करत, लवकरच पुरावे सादर करणार असल्याचे म्हटले आहे.
रश्मिकाच्या टीमचे स्पष्टीकरण :
या आरोपांनंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या टीमने अधिकृत प्रतिक्रिया देत हे आरोप फेटाळले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, “रश्मिकाने बेंगळुरू चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिला आणि तिने भाषेबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या काही अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही आणि त्या पूर्णपणे खोट्या आहेत,” असे रश्मिकाच्या टीमने स्पष्ट केले.
रश्मिकाच्या टीमने हे आरोप फेटाळल्यानंतर, काँग्रेस आमदार रवी गनिगा यांनी आपला दावा पुन्हा पुढे करत सांगितले की, “आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. रश्मिका हिला बेंगळुरू चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते, मात्र तिने कोणतेही वैध कारण न देता नकार दिला. अभिनेत्रीला अनेक वेळा बोलावण्यात आले, पण तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही,” असे त्यांनी सांगितले.
Rashmika Mandanna l कन्नड भाषेबाबत वादग्रस्त आरोप :
रवी गनिगा यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले की, “रश्मिका मंदाना हिने ‘किरिक पार्टी’ (Kirik Party) चित्रपटाद्वारे करिअरला सुरुवात केली. मात्र, जेव्हा आम्ही तिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले, तेव्हा तिने नकार दिला.
आमच्या एका आमदार मित्राने तिच्या घरी 10-12 वेळा भेट दिली, पण तिने कोणतेही कारण न देता उपस्थित राहण्यास नकार दिला. शिवाय, रश्मिकाने कन्नड भाषेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे अशा वर्तनासाठी रश्मिकाला धडा शिकवला गेला पाहिजे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.