वळवळणाऱ्या जिभा व हात कलम करण्याची हिंमत दाखवा- शिवसेना

मुंबई | गुजरात विधानसभेच्या निवडणुकीवरुन शिवसेनेकडून भाजपवर सुरु असलेला हल्लाबोल काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. मोदीसाहेब कृती करा, पाकड्यांची जपमाळ किती ओढाल, असा सल्ला आता शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. 

नेमकं काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात-

-गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. मोदी यांची चिंता समजण्यासारखी आहे, पण पंतप्रधानांनी आरोप करायचे नसतात, कृती करायची असते.

-कालपर्यंत कश्मीरात पाकिस्तानचा हस्तक्षेप होता. लेह, लडाख, अरुणाचलमध्ये चीनचा हस्तक्षेप होता. तो कमी होण्याऐवजी अलीकडे जास्तच वाढला आहे.

-पालनपूर येथील एका सभेत मोदी यांनी अशी ठिणगी टाकली की, पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफीक यांनी अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ काय? असा खडा सवाल मोदी यांनी विचारला आहे व तो शतप्रतिशत योग्य आहे.

-हिंदुस्थानच्या एखाद्या राज्यात कोणी मुख्यमंत्री व्हायचे व कोणी नाही हा चोंबडेपणा करण्याचा अधिकार पाकड्यांना कोणी दिला? पाकड्यांनी आज अहमद पटेलांचे नाव घेतले. त्यांनी काशीनाथ रुपाला किंवा भरतसिंह सोलंकी यांचे नाव घेतले असते तरीही ते योग्य नाही.

-अहमद पटेल यांच्या नावाचा उद्धार करून गुजरात निवडणुकीत कुणी हिंदू-मुसलमान मतांची फाळणी करून निवडणुका जिंकू पाहत आहेत का, हादेखील प्रश्न उद्या उपस्थित होऊ शकतो.

-हिंदुस्थानचे पंतप्रधान वाजपेयी हे भले माणूस असून त्यांनीच पंतप्रधानपदी राहावे अशी भूमिका तेव्हा पाकड्यांच्या गोटात होतीच.

-गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतही पाकड्यांचा हात व जीभ वळवळत असेल तर फक्त प्रचार सभांतून आरोपांचा धुरळा न उडवता पंतप्रधानांनी या वळवळणाऱ्या जिभा व हात कलम करण्याची हिंमत दाखवायला हवी.

-राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजप सरकारने शर्थ केली होती. तोच शर्थीचा डाव त्यांनी पाकविरोधात लावला तर पाकड्यांचा हिंदुस्थानविरुद्ध एकही डाव यशस्वी होणार नाही.

-प्रत्येक निवडणुकीत सध्या एक तर पाकिस्तान आणले जाते नाहीतर दाऊद इब्राहिमचा तडका मारला जातो. ही वैचारिक दिवाळखोरी आहे.

-पायाखालची वाळू सरकली की पाकिस्तान व दाऊदची जपमाळ ओढायची असाच प्रकार सध्या सुरू आहे. हा एकप्रकारे ‘नापाक’पणाच आहे. मागे बिहार निवडणुकीच्या प्रचारातही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पाकिस्तानला घुसवलेच होते.

-मोदी यांनी असाही आरोप केला आहे की, मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत मीडियात वृत्त होते. या बैठकीत पाकचे उच्चायुक्त, पाकचे माजी विदेशमंत्री, हिंदुस्थानचे माजी उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित होते. मोदी म्हणतात, तीन तास ही बैठक चालली. जर ही बैठक देशविरोधी कृत्यांसाठी वगैरे झाली असेल तर पंतप्रधान नुसते ‘आरोप’ का करीत आहेत? राष्ट्रीय सुरक्षेसाठी बैठकीतील एकजात सगळय़ांना ‘अटक’ करा व चौकशी करा.

-डॉ. मनमोहन सिंग यांच्या राष्ट्रभक्तीविषयी मोदी यांच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर त्यांनी बेशकपणे तसे बोलायला हवे. मोदी यांनी आरोप केले, पण सरकारकडे प्रचंड ताकदीची गुप्तचर यंत्रणा असते. तरीही पाकसोबतच्या बैठकीचे वृत्त पंतप्रधानांना मीडियातून कळले. तेव्हा हीसुद्धा बाब तितकीच गंभीर आहे.

-पुन्हा पाकच्या हस्तक्षेपावर प्रचारसभांतून का बोलता? असा हस्तक्षेप सुरू असेल तर पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा. पाकड्यांची जपमाळ किती ओढाल? आरोपांच्या फैरी काय, यशवंत सिन्हा व नाना पटोलेसुद्धा झाडतात.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा