नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर बसवा!

मुंबई | कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट करणारे दरोडेखोर सरकारी कृपेने सुखरूप आहेत, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर निशाणा साधलाय. 

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर ताशेरे ओढण्यात आलेत. तसेच नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर करण्याची मागणी करण्यात आलीय. 

नेमकं काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात?-

-हिंदुस्थानात विकासकामांसाठी पैशाची कमतरता नाही; पण बादलीलाच जर छिद्र असेल तर पाणी भरणार कसे, असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

-नीरव मोदी याने जानेवारीतच देश सोडल्याचे उघड झाले, पण गेल्याच आठवड्य़ात हे महाशय पंतप्रधान मोदींबरोबर ‘दावोस’ येथे मिरवत होते व मोदी यांच्यासोबतची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत.

-नीरव मोदी हा भारतीय जनता पक्षाचा ‘हमसफर’ होता व निवडणुकांसाठी पैसा जमा करण्यात हे महाशय आघाडीवर होते. अर्थात इतका मोठा घोटाळा नीरवने भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने केला व त्याने बँकांची जी लूट केली त्यातला वाटा भाजपच्या खजिन्यात गेला असा आरोप आम्ही करणार नाही! पण भाजपची श्रीमंती वाढवण्यात व निवडणुका जिंकण्यासाठी वगैरे पैशांचे डोंगर उभे करण्यात असे अनेक नीरव मोदी झटत आहेत.

 न खाऊंगा न खाने दूंगा’ ही पंतप्रधान मोदी यांची घोषणा येथे अपयशी ठरली आहे. पंजाब नॅशनल बँकेत नीरवभाईने घोटाळा केल्याची तक्रार आधीच दाखल झाली होती तरीही हा माणूस दावोसला कसा गेला, दावोस येथे पंतप्रधान मोदी यांना जे उद्योगपती भेटले त्यात तो कसा सहभागी झाला हे आधी सांगा.

-नीरव मोदीचे आधार कार्ड बँक खात्यास ‘लिंक’ केले असते तर काही गोष्टी उघड झाल्या असत्या. सामान्य माणसाला ‘आधार कार्डा’शिवाय स्मशानात लाकडेही मिळत नाहीत व इस्पितळात प्रवेश मिळत नाही, पण नीरव मोदीने ‘आधार कार्डा’शिवाय अकरा हजार कोटींची लूट बँकांतून केली.

-2014 साली निवडणुका जिंकून देण्यात ‘भाजप’च्या मागे जे धनदांडगे उभे राहिले ते काय लायकीचे होते हे आता दिसले. भ्रष्टाचारमुक्त देश व पारदर्शक कारभाराची लक्तरे फक्त 3 वर्षांत निघाली.

-शे-पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. त्याच्या घरादारावर जप्तीचा नांगर फिरतो, पण देशातील बनेल उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट केली व ते सगळे दरोडेखोर सरकारीकृपेने ‘सुखरूप’ आहेत.

-देश सध्या जाहिरातबाजीवर चालला आहे. प्रसिद्धी व जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च सुरू आहे. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुरामन राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा, म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल!