Mumbai | विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान नुकतंच पार पडलं आहे. 23 तारखेला निकाल येणार आहे, मात्र तत्पूर्वीच मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते सचिन विद्याधर शिंदे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच भाजपला रामराम करताना सचिन शिंदे यांनी एक निवेदन जारी केलं आहे. नेमकं काय म्हटलंय त्यांनी पाहुयात…
निवेदनात नेमकं काय?
प्रिय कार्यकर्ते, समर्थक व माध्यम प्रतिनिधी,
आज मी भारतीय जनता पक्षाच्या माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि त्यानुषंगाने मला दिलेल्या मुंबई सचिव पदाचा राजीनामा देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मी अत्यंत विचारपूर्वक, जनतेच्या सेवेला प्राधान्य देत घेतला आहे.
हा निर्णय घेताना मला स्पष्ट करावेसे वाटते की भारतीय जनता पक्षामध्ये माझ्यावर अन्याय झालेला नाही, मात्र योग्य न्यायही मिळालेला नाही ही खंत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी दादर-माहीम विभागात पक्ष-संघटना बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. पक्षाच्या धोरणांचे पालन करत सामान्य जनतेसाठी विविध उपक्रम राबवले आणि पक्षवाढीसाठी संपूर्ण योगदान दिले. मात्र, या सर्व योगदानाला यथोचित सन्मान व प्रोत्साहन मिळाले नाही.
माझ्या निर्णयाचा आधार हा कोणाविषयी नाराजी नसून, व्यापक लोकसेवेची अधिक संधी आणि जबाबदारी मिळावी, हाच मुख्य हेतू आहे. आज जनतेच्या समस्या अधिक गहन व व्यापक झाल्या आहेत. त्यासाठी अधिक प्रभावी व तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षामध्ये मला ही संधी मिळेल आणि मी माझे कर्तव्य अधिक प्रभावीपणे बजावू शकेन.
भारतीय जनता पक्षामधील माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या कार्याला पाठिंबा देणारे असंख्य कार्यकर्ते व नागरिक आजही माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यांनी माझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. या निर्णयामागील कारणे व माझ्या भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे निवेदन सादर करत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षामध्ये प्रवेश करून, मी माझ्या पुढील राजकीय वाटचालीला अधिक जोमाने व तळमळीने प्रारंभ करणार आहे. लोकसेवेच्या व्रताला वचनबद्ध राहून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी सातत्याने कार्यरत राहीन. माननीय श्री उद्धव साहेबांनी आणि माननीय श्री आदित्यजीनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला न्याय देण्यासाठी माझ्या पूर्ण क्षमतेने कार्य करीन. शिवसेनेच्या लढवय्या वारशाचा भाग होत, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याचा माझा दृढ संकल्प आहे.
धन्यवाद.
आपला,
श्री सचिन विद्याधर शिंदे
News Title – Sachin Shinde Join to Shivsena Thackeray Group
महत्त्वाच्या बातम्या-
सत्तेसाठी खटपट सुरु; निकालापूर्वीचं महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला
…तर मनोज जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही
‘राज’पुत्र अमित ठाकरे आमदार बनणार?, माहीममध्ये यंदा कोण मारणार बाजी?
महाराष्ट्रातील ‘हे’ मतदारसंघ ठरू शकतात जायंट किलर!
निकालापूर्वीच शरद पवार ॲक्शन मोडवर; उमेदवारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना?