हल्ल्यानंतर 17 दिवसांत कार्यक्रमात दिसला सैफ अली खान, म्हणाला ‘मला नेहमीच चोरीवर…’

Saif Ali Khan | सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) आयुष्यात १६ जानेवारी रोजी एक धक्कादायक घटना घडली. त्याच्या घरात एका घुसखोराने घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पाच दिवसांनी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या घटनेवर सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खानने प्रतिक्रिया दिली असून, प्रसारमाध्यमांना विनंती केली की, “आमच्या कुटुंबासाठी हा एक आव्हानात्मक काळ होता आणि आम्ही अजूनही घडलेल्या घटनांवर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत आहोत. या कठीण प्रसंगातून जात असताना, मी आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की मीडिया आणि पापाराझींनी सततचा पाठपुरावा आणि कव्हरेज टाळावे.”

सैफ दिसणार ‘या’ चित्रपटात

सैफ अली खानचा हा सार्वजनिक कार्यक्रम ‘ज्वेल थीफ: द हाइस्ट बिगिन्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या २०२५ च्या यादीतील प्रमुख चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात सैफ अली खानसोबत जयदीप अहलावत देखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद आणि निर्मिती ममता आनंद यांनी केली आहे. सैफने कार्यक्रमात आपल्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता व्यक्त केली. तो म्हणाला, “या चित्रपटासाठी सिद्धार्थ आणि मी खूप दिवसांपासून काम करत आहोत. मला नेहमीच चोरीवर आधारित चित्रपट करायचे होते आणि मला एक उत्तम सहकलाकार म्हणून जयदीपची साथ मिळाल्यामुळे आनंद झाला.”

चित्रपटाची कथा एका ज्वेल चोराच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते, जो आफ्रिकेतील अत्यंत दुर्मिळ ‘रेड सन’ हिरे चोरण्यासाठी गुन्हेगारी टोळीचा भाग बनतो. चित्रपटाची कथा अनेक वळणे घेत एक चित्तथरारक चोरी आणि अनेक रहस्यांनी भरलेली आहे. या चित्रपटात अॅक्शन, सस्पेन्स आणि कुतूहलाचे अनेक घटक आहेत, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सांगितले की, “हा चित्रपट प्रेक्षकांना एक खिळवून ठेवणारा सिनेमॅटिक अनुभव देईल आणि त्यात अॅक्शन, सस्पेन्स आणि थरार ठासून भरलेला आहे. आम्ही यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट नक्की आवडेल.”

काय म्हणाला Saif Ali Khan?

घुसखोराच्या हल्ल्याबद्दल बोलताना सैफ अली खान म्हणाला, “जरी हा एक खूपच कठीण आणि धक्कादायक अनुभव होता, तरीही मी त्यातून लवकरात लवकर बाहेर आलो आणि आज मी इथे तुमच्यासमोर उभा राहून खूप आनंदी आहे.” सैफने चित्रपटाची एक नवीन झलक आणि त्यामध्ये त्याच्या सहकलाकारांसोबतच्या कामाचा अनुभव शेअर केला. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दाखवलेल्या या उत्साहामुळे सैफचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील लोक त्याच्या धैर्याचे आणि जिद्दीचे कौतुक करत आहेत. सैफ अली खानच्या या जिद्दीने त्याच्या कुटुंबाचे तसेच त्याच्या चाहत्यांचे मन जिंकले आहे आणि त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Title : Saif Ali Khan promotes jewel thief kareena kapoor statement