Sambhaji Bhide l संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या निर्णयाचे विविध स्तरांमधून स्वागत केले जात असतानाच, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनीही या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
“धनंजय मुंडे आणि इतर राज्यकर्ते चुकीच्या दिशेने” :
संभाजी भिडे यांनी एका पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर भाष्य करताना सांगितले, “धनंजय मुंडे आणि इतर राज्यकर्ते जे काही वागत आहेत, ते बरोबर नाही. सर्व राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र वाचले पाहिजे. मराठ्यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे.”
तसेच संभाजी भिडे यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हणाले, “शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळेच आज संपूर्ण देश उभा आहे. ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले.’ मराठे आरक्षण मागून स्वतःला संकुचित करून घेत आहेत. मराठ्यांनी आरक्षण मागायचे नसते, तर देश चालवायचा असतो.”
Sambhaji Bhide l “मराठ्यांनी आपली ताकद ओळखली पाहिजे” :
ते पुढे म्हणाले, “संभंध देशाचा संसार चालवण्याची ताकद मराठा समाजात आहे. पण दुर्दैव असे की, मराठ्यांना आपण कोण आहोत हेच कळत नाही. जर हा देश टिकवायचा असेल, तर मराठ्यांचा इतिहास दहावीपर्यंत सक्तीचा केला पाहिजे. कोणत्याही भाषेतील विद्यार्थी असोत, त्यांनी मराठ्यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे.”
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला आहे. लातूर, बीड आणि धाराशिवमध्ये आंदोलने सुरू असून, धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकारवर वाढता दबाव लक्षात घेता, पुढील राजकीय हालचाली महत्त्वाच्या ठरणार आहेत.