Sanjay Raut | शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी असलेल्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या शाह यांना राऊत यांनी ठाम प्रत्युत्तर दिले. त्यांनी सहकार क्षेत्राच्या उभारणीत पवारांच्या भूमिकेचे महत्व पटवून दिले आणि शाहांच्या सहकारातील भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. (Sanjay Raut)
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने मालेगावात आयोजित कार्यक्रमात अमित शाह यांनी शरद पवारांवर टीका केली होती. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया देत, “जर शरद पवार यांचे सहकार क्षेत्रासाठी योगदान नाही, तर अमित शाह यांचे योगदान तरी काय आहे?” असा प्रश्न उपस्थित केला.
शरद पवार यांचे सहकार क्षेत्रातील योगदान
राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या उत्तरात शरद पवार, यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) आणि धनंजय गाडगीळ (Dhananjay Gadgil) यांचे सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला. “शरद पवारांनी सहकार वाढविण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण उभे राहण्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्राला बळकटी दिली. पवारांनी सहकार बंद केला नाही, तर वाढवण्याचे कार्य केले,” असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, त्यांनी शरद पवारांच्या कार्यकालातील सहकाराच्या प्रगतीबद्दल बोलताना नमूद केले की, “सहकार क्षेत्र ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जीवनरेखा आहे, आणि पवारांनी त्यासाठी अमूल्य प्रयत्न केले आहेत.”
अमित शाह यांच्यावर राऊतांचे आरोप
अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधताना राऊत म्हणाले, “शाह सहकार मंत्री झाल्यानंतर सहकार क्षेत्रात घरघर लागली आहे. गुजरातमधील सहकारी बँक घोटाळ्यांचा उल्लेख करत त्यांनी शाहांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. “कोव्हिड काळात गुजरातमधील सहकारी बँकांमध्ये मोठे घोटाळे झाले. महाराष्ट्रात मात्र भाजपने विरोधी पक्षांच्या सहकारी बँका आणि कारखाने बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले,” असे त्यांनी आरोप केले.
राऊत (Sanjay Raut) यांनी पुढे सांगितले की, “सहकारी कारखाने बंद पाडले जात असताना त्या कारखान्यांवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांवर परिणाम होतो. मात्र शाह हे बदल्याचे राजकारण करण्यात व्यस्त असतात,” अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.