बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनू सूद भाजप स्पॉन्सर?; वाचा संजय राऊतांच्या रोखठोकमधील सर्व महत्त्वाचे मुद्दे

सामनाच्या रोखठोक या स्तंभाच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनेता सोनू सूदच्या कामावर टीका करणारा लेख लिहिला आहे. सोनू सूदचा चेहरा पुढे करुन काही घटक ठाकरे सरकार कसे अपयशी ठरले हे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या लेखाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्या लेखातील सर्व महत्त्वाचे मुद्दे-

-महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची फार मोठी परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुले ते बाबा आमटे. या नावांमध्ये आता आणखी एका महान सामाजिक कार्यकर्त्याचे नाव जोडावं लागेल ते म्हणजे सोनू सूद!

-‘लॉक डाऊन’च्या काळात सोनू सूदने जे केले ते बहुधा केंद्र, राज्य सरकारलाही जमले नाही. सोनू सूद हा हिंदी चित्रपटातला खलनायकाच्या भूमिका वठवणारा एक अभिनेता आहे. अलीकडच्या चित्रपटांत तो पडद्यावर दिसला, पण लॉक डाऊनच्या काळात मागचे पंधरा दिवस तो घाम गाळत, उन्हातान्हात रस्त्यावर वावरताना दिसला.

-उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, दिल्ली येथे जाऊ पाहणाऱ्या लाखो मजुरांसाठी सोनू सूद म्हणजे देवदूताप्रमाणे अवतरला. त्याने हजारो मजुरांना अलगद आपल्या घरी सुरक्षित पोहोचवले. गावी निघालेल्या मजुरांना कृतार्थ भावाने निरोप देताना सोनूची छायाचित्रे व व्हिडीओ प्रसिद्ध झाले.

-सरकार मजुरांना पोहोचवण्यात अपयशी ठरले, पण सोनू सूदसारखे नवे महात्मा किती सहजतेने मजुरांना मदत करीत आहेत, असा प्रचार समाजमाध्यमांतून सुरू झाला. सोनू सूदने केलेल्या या कार्याची दखल महाराष्ट्राच्या राज्यपालांना घ्यावी लागली व सोनूला चहापानासाठी राजभवनाचे निमंत्रण आले.

-सोनू सूद यांनी गेल्या काही दिवसांत हजारो मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवले. रेल्वे, बसेस, विमानाची तिकिटे त्यांनी काढली. प्रवासाची व्यवस्था केली. एक चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमांतून हे सर्व केले. ट्रस्टच्या माध्यमातून जमलेल्या पैशांतून मजुरांचा हा प्रवास खर्च उचलला असे सांगितले गेले.

-केरळच्या एर्नाकुलम येथे ओडिशाच्या 177 मुली अडकून पडल्या. त्यांना सूद महाशयांनी एका खास विमानाने भुवनेश्वरला पोहोचवले. विमानाची व्यवस्था होत नव्हती, तेव्हा बंगळुरूवरून एक खास विमान कोच्चीला आणले व तेथून या सर्व मुलींची रवानगी ओडिशाला केली. त्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोनू सूद आणि कंपनीचे आभार मानले आहेत.

-एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय? राज्याराज्यांची सरकारे या स्थितीत हतबल झालेली मी पाहिली. मजूर चालतच निघाले व लाखो मजूर बिहार, उत्तर प्रदेशच्या सीमेवर जाऊन रखडले. त्यांना तेथे घोटभर पाणीही मिळत नव्हते. सोनू सूद त्या भुकेल्यांच्या खवळलेल्या गर्दीत पोहोचले नाहीत.

हे लाखो लोक तेथे पोहोचले ते काय फक्त सोनू सूदने खास व्यवस्था केलेल्या बस, रेल्वेने? ते आपले कुटुंबाचे ओझे वाहत चालतच निघाले. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था जशी महाराष्ट्र सरकारने केली तशी इतरत्र झाल्याचे दिसत नाही.

-केंद्र सरकारने तर या मजुरांना वाऱ्यावर सोडले. मजुरांना आपापल्या गावी जाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने एक खास कक्ष उभा केला, पण ‘‘कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल,’’ असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काही करत नाही, पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला.

-सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, ‘बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले.

-भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले (हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूद हा एक अभिनेता आहे. पैसे घेऊन हवे ते संवाद फेकायचे व अभिनय करायचा हा त्याचा पेशा आहे.

-काही वर्षांपूर्वी ‘कोब्रा पोस्ट’च्या एका स्टिंग ऑपरेशनने सोनू सूदच्या अशाच व्यवहाराचा भांडाफोड केला आहे. सोशल माध्यमांवर इन्स्ट्राग्राम, ट्विटर अकाऊंटवरून छुप्या पद्धतीने भाजपच्या कार्याचा उदोउदो करण्याचे त्याने मान्य केले होते व त्यासाठी महिन्याला ‘दीड कोटी’ इतकी बिदागी त्याने मागितली होती. भारतीय जनता पक्षाचा नेता बनून सूदला भेटलेला ‘कोब्रा’चा प्रतिनिधी व सूदमधील व्यवहार्य संवाद धक्कादायक आहे.

-पैसे मिळाले तर कुणाचाही मुखवटा लावून वावरायचे व प्रचार करायचा हे सूदसारख्या अनेकांचे धंदे आहेत. त्यामुळे मजुरांचे दुःख वगैरे पाहून सूद महाशय भावनाविवश झाले, त्यांच्यातल्या माणुसकीची ज्योत फडफडू लागली, यावर कोणी शहाणा माणूस विश्वास ठेवायला तयार नाही.

-कोरोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय?

-सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो? या सर्व यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. तर हा फक्त एक चेहरा आहे. गर्दीतल्या सोनूच्या मागे शंकर पवार उभे असल्याचे अनेक छायाचित्रांत दिसत आहे.

-सोनू सूदला महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राजभवनावर खास बोलावून घेतले व तो करत असलेल्या मदतकार्याची माहिती घेतली. सोनू सूद राजभवनात जाऊन राज्यपालांना भेटला व स्थलांतरित मजुरांची वेदना मांडली. त्यावर राज्यपालही भावनाविवश झाले. राज्यपालांनी सोनू सूदला आशीर्वाद दिला व म्हणाले, ‘‘सोनूजी, आप महान कार्य कर रहे है, इसकी जितनी सराहना की जाए, कम है. राजभवनातून तुला जी मदत हवी ती मिळेल.’’

-महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, बँक कर्मचारी गेल्या तीन महिन्यांत जिवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मुंबई पालिका व इतर अनेक सामाजिक संस्था करीत आहेत. त्या सगळ्यांची यादी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राजभवन प्रशासनाकडे पाठवायला हवी. हे सगळे अंधारात राहिले. कारण ते सेवाभावाने काम करीत राहिले. ते सोशल माध्यमांवर चमकले नाहीत व त्यांच्या कार्याच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांनी नेमलेल्या ‘प्रसिद्धी’ कंपन्या उतरल्या नाहीत.

-मी असे वाचले की, सोनू रोज मुंबईत फसलेल्या एक हजार बाराशे मजुरांना त्यांच्या घरी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, बंगाल, मध्य प्रदेशात बसने पोहोचवत होता. त्यापैकी प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी मजुरांना इतक्यात पाठवू नका असे बजावले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज कोरोनामुक्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय कुणालाही आपल्या राज्यात घ्यायला तयार नव्हते. मग हे मजूर नक्की पोहोचले कोठे? लॉक डाऊन काळात इतक्या बसेसची नियमबाहय़ व्यवस्था झाली कशी?

-सोनू सूद जणू एक समांतर सरकार चालवत होता व त्याला हवे ते सर्व मिळत होते. सोनू सूद या महात्म्याचे नाव आता पंतप्रधान मोदींच्या एखाद्या ‘मन की बात’मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस निघतील व एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील. तसा करार आधीच झाला असेल म्हणून सोनू सूद लॉक डाऊनचा मालामाल हीरो म्हणून तळपत राहिला.

इतर सर्व हिरो लॉक डाऊन काळात घरीच बसले तेव्हा सोनू सूदचा अभिनय बहरून निघाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले.

-सोनू सूद हा एक उत्तम अभिनेता आहेच. त्याच्या मनात सामाजिक कार्याची तळमळ असेलही. त्याने रस्त्यावर उतरून जे काम केले, भले ते ‘प्रायोजित’ असेल, पण देशभरातील लोकांनी ते पाहिले.

इतर अनेक अभिनेते, क्रिकेटपटूंनीही, मग ते सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर वगैरे असतील, या सगळ्यांनी कोरोना काळात कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे.

-महाराष्ट्रात अनेकांनी आपल्या ‘पेन्शन’च्या रकमा, पगाराचे धनादेश या कार्यासाठी जमा केले. लहान मुलांनी वाढदिवसाचा ‘खर्च’ टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली. याच पैशातून लाखो मजुरांच्या राहण्या-खाण्याची, पुढच्या प्रवासाची व्यवस्था झाली. त्यापैकी अनेकांचे ‘दान’ गुप्तच राहिले. कारण हे सर्व लोक प्रायोजित नव्हते. सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावरही उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते.

-सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता? त्याचा खुलासा लवकरच होईल!

सौजन्य- दैनिक सामना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More