मुंबई | लॉकडाऊनमुळे महसुलात तूट वाढत जाईल व राज्य चालवणे कठीण होईल. त्यात सरकारी कर्मचाऱयांचे पगार, प्रशासकीय खर्च, शेतकरी कर्जमाफी, अस्मानी-सुलतानी संकटाचा विचार केला तर योजना राबवायच्या कशा? केंद्राचेही तसेच होणार आहे. भारतात यापुढे भारत-पाकिस्तानचा खेळ, धर्म व जातवादाची प्यादी हलवणे बंद करून कोरोनाच्या संकटानंतर देशाला आर्थिक खाईतून कसे बाहेर काढता येईल यावर सर्वच राजकीय पक्षांनी काम केले पाहिजे. पंतप्रधानांनी त्याकामी पुढाकार घ्यावा. देश पाठीशी उभा राहील, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी-रघुराम चर्चेने आर्थिक संकटाचा विषाणू किती गंभीर आहे ते समोर आले. ही शहाणे होण्याची वेळ आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अर्थतज्ञ रघुराम राजन यांच्याशी डिजिटल’ माध्यमातून संवाद साधला. हा संवाद जनतेलाही ऐकता आला हे बरे झाले. ‘लॉक डाऊन’नंतर निर्माण होणाऱया आर्थिक परिस्थितीची दुसरी परखड बाजू यानिमित्ताने समजून घेता आली. गोरगरीबांना मदत करण्यासाठी सरकारने 65 हजार कोटी रुपये खर्च करणे आवश्यक असल्याचे मत रघुराम राजन यांनी मांडले आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते संसदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे मत, त्यांनी केलेल्या चर्चा याची खिल्ली उडवता येणार नाही, असंही राऊत आपल्या अग्रलेखात म्हणाले आहेत.
राहुल गांधी-रघुराम राजन या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे अमर्याद काळापर्यंत लॉक डाऊन चालू ठेवणे अर्थव्यवस्थेला महागात पडेल. सरकारला नियमांच्या चौकटी मोडून काम करावे लागेल व सत्ता, निर्णयाचे अधिकार आज आहेत तसे एका दोघांच्याच मुठीत न ठेवता त्याकडे सामुदायिक पद्धतीने पाहावे लागेल. पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत, पण आता आभाळच फाटले आहे. हे फाटके आभाळ फक्त एकविचारी लोकांची तुतारी फुंकून शिवता येणार नाही. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे घरखर्च कसे चालणार? असे एक ना अनेक प्रकारचे प्रश्न असल्याचं राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.
भाषणे, आश्वासने यांना मर्यादा पडतात व लोकांच्या पोटातली आग त्यावर हल्ला करते. लोकांनी संयम पाळायचा हे ठीक, पण सरकारला गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या देखील बदलत्या आर्थिक स्थितीचा विचार करावा लागेल. मुख्य म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावे लागेल व दुसऱ्यांचे देखील ऐकावे लागेल, असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
तळीरामांना मोठा दिलासा; दारुची दुकानं सुरू होणार पण…
महाराष्ट्र दिनी केंद्राचा महाराष्ट्राला धक्का; आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवलं
महत्वाच्या बातम्या-
किम जोंगची तब्येत धडधाकट… ट्रम्प म्हणतात, मला आता यावर काहीच बोलायचं नाही!
किम जोंग उनच्या तब्येतीबद्दल नवी माहिती समोर!
पुण्यात नव्याने 93 कोरोनाबाधितांची नोंद; पूर्व भागात रूग्ण का वाढतायेत?
Comments are closed.