Kunal Kamra Set l स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या पॅरोडी व्हिडिओवरून निर्माण झालेल्या वादामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खार येथील ‘द हॅबिटॅट क्लब’मध्ये संतप्त शिवसैनिकांनी मोठा राडा करत सेटची तोडफोड केली. या प्रकरणात कुणाल कामराला अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. आता या घडामोडींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात गुंडाराज – राऊतांचा आरोप :
संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभले आहेत. पोलिसांच्या उपस्थितीत ५०-६० जण स्टुडिओ फोडतात आणि पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेतात. यावरून हे स्पष्ट होते की, राज्यात गुंडाराज सुरू आहे.” त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून प्रश्न विचारला आहे की, “ज्याप्रमाणे नागपूरमध्ये दंगलखोरांकडून नुकसान भरपाई घेतली जाते, त्याचप्रमाणे कुणाल कामराचा सेट तोडणाऱ्यांकडूनही नुकसान भरपाई घेणार का?” त्यांनी यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Kunal Kamra Set l पोलीस यंत्रणेवर संशयाची सुई :
राऊत यांनी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, “ही संपूर्ण घटना दीड-दोन तास आधीपासून नियोजित होती. तरीही पोलिसांनी वेळेवर कारवाई का केली नाही?” त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी करत, संबंधित पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज असल्याचे नमूद केले.
या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.