Santosh Deshmukh murder Case | मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder Case) यांच्या हत्या प्रकरणाचा अद्याप पूर्ण छडा लागलेला नाही. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Aandhale) हा अजूनही फरार असून, अटकेत असलेल्या आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याचा मोबाईलही पोलिसांना सापडलेला नाही. या तपासाच्या दिरंगाईवर प्रश्न उपस्थित करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिस तपासावर गंभीर आरोप
धनंजय देशमुख यांनी “न्याय मिळेपर्यंत मी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार” असल्याचे स्पष्ट केले आहे. “७० दिवस उलटूनही आरोपी अटक होत नाहीत, त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात,” असे ते म्हणाले.
त्यांनी असा आरोप केला की, “आरोपीशी मैत्री असलेल्या व्यक्तीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. हे अत्यंत धक्कादायक आहे. बालाजी तांदळे (Balaji Tandle) हा मुख्य आरोपीला आदर्श मानतो. तरीही पोलिसांनी त्याची गाडी घेऊन १०,००० किमी प्रवास केला. पोलिसांनी त्याची गाडी का वापरली? तसेच, तो पोलीस ठाण्यात आणि जेल परिसरात सतत वावरत असल्याचे दिसून येते,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
धनंजय देशमुख यांनी सांगितले की, “मंगळवारपासून मस्साजोग गावकरी संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत. हे आंदोलन बेमुदत असेल.”
यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील (Manoj Jarange Patil) देखील सहभागी होणार आहेत. मात्र, “त्यांनी अन्नत्याग करू नये, त्यांची प्रकृती आमच्यासाठी महत्त्वाची आहे,” असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार?
या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, “त्यांच्याशी माझा अद्याप संपर्क झाला नाही, मात्र सर्वजण आमच्या सोबत आहेत,” असे धनंजय देशमुख यांनी सांगितले. (Santosh Deshmukh murder Case)
Title : Santosh Deshmukh Murder Case Dhananjay Deshmukh Announces Indefinite Hunger Strike