शरद पवार राजकारणातून संन्यास घेणार?, स्वतःच दिले मोठे संकेत

Sharad Pawar | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सगळीकडेच सध्या प्रचारसभा रंगताना दिसून येत आहेत. अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी स्वतः राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. “दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल”, असं ते म्हणाले आहेत. (Sharad Pawar)

राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्य करत राहणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षच फुटला. तेव्हाही शरद पवार यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा रंगली होती.

“पुढच्या 30 वर्षांची व्यवस्था करण्याची गरज..”

आता शरद पवारांनी राजकीय निवृत्ती घेण्याचेच थेट संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. पवारांनी बारामतीमध्ये आज युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. “तुमच्यातले काही लोक त्या वेळी हयात होते, काहींचा जन्म झाला नव्हता. 55 वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राच्या सगळ्या भागात काम करायला सुरुवात केली. 1967 साली त्यावेळच्या मतदारांनी मला निवडून दिलं. त्यातले काही मतदार मला अजूनही इथे दिसत आहेत.”, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

“30 वर्षांपूर्वी मी निर्णय घेतला की आता मी लोकसभेला उभा राहणार नाही. इथलं राजकारण मी बघणार नाही. ही सगळी जबाबदारी अजित पवारांकडे देईन. जवळपास गेली 25-30 वर्षं ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. पहिली 30 वर्षं माझ्यावर, माझ्यानंतर 30 वर्षं अजित पवारांवर. आता पुढच्या 30 वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे. ती करायची असेल तर लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यात लक्ष घालण्याची दृष्टी हवी.”, असंही पवार प्रचारसभेत म्हणाले.

“आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी..”

“मी आत्ता राज्यसभेत आहे. अजून दीड वर्षं टर्म आहे. त्यानंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचाही विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढवणार नाही. कोणतीच निवडणूक लढवणार नाही. किती निवडणुका लढवायच्या? आत्तापर्यंत 14 निवडणुका लढवल्या. आणि तुम्ही असले लोक आहात की एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडूनच देताय. पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी आणली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय”, असं वक्तव्य करत शरद पवार(Sharad Pawar) यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

News Title –  Sharad Pawar big statement

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंनी 5 नेत्यांची केली हकालपट्टी; ‘या’ नेत्यांचा समावेश

माजी खासदाराचा भाजपला रामराम; आता शिंदेंच्या उमेदवाराला देणार आव्हान

राज्यात कोणी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतले? पाहा संपूर्ण यादी एका क्लीकवर

गुड न्यूज! दिवाळी सरताच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

मोदी-शहांची तळी राज ठाकरे उचलतायेत; ‘या’ नेत्याची टीका