तर मग मला पद्मविभूषण का दिला?; शरद पवारांचा मोदींना सवाल

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी मला पाकिस्तानचा समर्थक म्हणतात. मग त्यांनी मला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पद्मविभूषण कसा काय दिला?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

शरद पवारांना पाकिस्तानचा पाहुणचार भावला आहे. त्यामुळेच ते आपले शत्रू राष्ट्र पाकिस्तानचे कौतुक करत आहेत, असं म्हणत मोदींनी पवारांवर टीका केली होती. यावरुन शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

माझा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. म्हणजे मी देशहितासाठी काहीतरी केलं आहे. मात्र, दुसरीकडे मला पाकिस्तानचा समर्थक म्हणायचे. अशा प्रकारचा दुतोंडीपणा देशाच्या सर्वोच्च पदी बसणाऱ्या व्यक्तीने दाखवणं शोभणारं नाही, असं पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, नाशिक येथील भाजपच्या महाजनादेश यात्रेत नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली होती. पाकिस्तानबाबत काँग्रेसचा गोंधळ मी समजू शकतो. मात्र, शरद पवारांना देखील पाकिस्तान चांगला वाटावा हे दुर्दैव आहे, अशी टीका मोदींनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-