Sharad Pawar | ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना खोकला आणि कफचा त्रास होऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती पूर्णपणे बरी होईपर्यंत ते पुण्यातील मोदी बागेत असलेल्या त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात जाणवला त्रास
२३ जानेवारी रोजी संतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी झाले असतानाच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता.
या सभेच्या अध्यक्षस्थानी ते स्वतः होते. त्यानंतरही त्यांनी पूर्वनियोजित दौरे सुरूच ठेवले होते. मात्र, शुक्रवारी रात्री पुण्यात परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि खोकल्याचा त्रासही बळावला.
डॉक्टरांचा सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला
शरद पवार (Sharad Pawar) यांना जाणवणार्या त्रासानंतर त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या सल्ल्यानंतर त्यांचे पुढील काही दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताचे खंडन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. “शरद पवार यांना थोडा थकवा जाणवत आहे आणि डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे ते घरीच विश्रांती घेत आहेत,” असे त्यांनी सांगितले. तसेच, शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले.
Title : Sharad Pawar Public Events Cancelled Due To Health Concerns