Sharad Pawar l राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सध्या पुण्यात आहेत, आणि त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी पुढील चार दिवसांचे नियोजित दौरे रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नाही.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आपल्या दौऱ्यांमुळे सक्रिय असलेल्या शरद पवार यांना अचानक आलेल्या अस्वस्थतेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी पवार हे प्रेरणास्थान असून त्यांच्या प्रकृतीविषयी सध्या तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दौरे रद्द आणि राजकीय घडामोडी :
शरद पवार यांनी आपल्या आगामी चार दिवसांचे सर्व दौरे रद्द केल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडून अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप आणि शिंदे गटासोबत महायुतीत सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी पक्षाचे पुनर्बांधणीचे काम हाती घेतले होते.
नवे चिन्ह ‘तुतारी’ (Tutari) स्वीकारून त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार धक्का दिला. बारामतीमध्ये महायुतीच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा पराभव करून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विजय मिळवला होता.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभेत मात्र महायुतीने राज्यभरात मोठा विजय मिळवला. 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर भाजप (BJP) 131 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. दुसरीकडे, महाविकास आघाडीला (MVA) केवळ 50 जागा मिळाल्या, आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला 10 जागांवर समाधान मानावे लागले.
शरद पवार यांचे राजकीय दौरे आणि लढाऊ वृत्ती :
प्रकृती अस्वस्थ असूनही शरद पवार यांनी आपल्या लढाऊ वृत्तीचा परिचय दिला आहे. विधानसभेतील अपयशानंतरही त्यांनी राज्यभर दौरे करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. त्यांचे सध्याचे दौरे पक्षासाठी नवी ऊर्जा देण्यासाठी महत्त्वाचे ठरत होते. मात्र, प्रकृती खालावल्यानंतर त्यांनी काही काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.