शिंदे-फडणवीस सरकारची सर्वात मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्रातच नाही पण संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं. शिवरायांचे आठवावे ते रूप, शिवरायांचा आठवावा तो प्रताप… हे आपण उगाच म्हणत नाहीत. शिवरायांच्या साहस कथा, त्यांचे विचार या सगळ्यांची आजही प्रेरणा घेतली जाते.

महाराजांचे पराक्रम आणि त्यांच्या पराक्रमाचे साक्षिदार सगळ्याच गोष्टींचा आपल्याला अभिमान आहे. स्वराज्याची स्थापना करताना महाराजांनी जवळपास 400 गड-किल्ले त्यांच्या अधिपत्याखाली आणले. जे आपण आजही ऐतिहासिक ठेवा म्हणून जपतो. असं असलं तरी महाराजांच्या पराक्रमाची साक्षीदार असलेली त्यांची जगदंबा तलवार आणि अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी महाराजांनी वापरलेले वाघनखे मात्र आजही ब्रिटनमध्ये आहेत. पण महाराष्ट्राच्या अभिमान असलेल्या या दोन्ही गोष्टी आता लवकरच महाराष्ट्रात परत येऊ शकतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षीदार असलेली जगदंबा तलवार आणि त्यांची वाघनखं ही ब्रिटनमधील म्यूझिअममध्ये ठेवण्यात आलीयेत. एकिकडे राज्यात शिवरायांचा अपमान केल्यावरून वादळ उठलंय. तर दुसरीकडे शिवरायांच्या पराक्रमाचं प्रतीक असणारी जगदंबा तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची मोठी घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रासाठी अभिमानाच्या असणाऱ्या या दोन्ही गोष्टी लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न आता सुरू झालेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पण याबाबतचा प्रस्ताव मांडला असल्याचं मुनगंटीवार म्हणालेत. इतकंच नाही पण भारतीय वंशाचे ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांचींही यासाठी मदत घेतली जाऊ शकते. आम्ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. जर ब्रिटनने तलवार सुपूर्द केली तर 2024 मधील विशेष दिवसासाठी आम्हाला खूप मदत होईल, अशी माहिती पण मुनगंटीवार यांनी दिलीये.

2024 साली शिवरायांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडे तिनशे वर्ष पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. जर या कार्यक्रमापर्यंत ब्रिटनने ही जगदंबा तलवार परत दिली तर या आनंदोत्सवाला नक्कीच चार चाँद लागणारेत. शिवरायांकडे तुळजा, भवानी आणि जगदंबा या तीन मौल्यवान तलवारी होत्या. शिवरायांचा प्रताप, त्यांचा गनीमीकावा, स्वराज्यासाठी केलेल्या लढाया या सगळ्याची साक्षीदार असणारी यातीलच जगदंबा तलवार सध्या ब्रिटनमध्ये आहे. महाराजांचा स्पर्श लाभलेली ही तलवार परत आणण्यासाठी शिंदे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

तर प्रतापगडच्या पायथ्याशी झालेला अफजलखानाचा वध ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे सहाजिकच यासाठी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांबद्दलपण सगळ्यांना तेवढंच कुतुहल आहे. अर्थात आता राज्य सरकार या दोन्ही गोष्टी परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, राज्यसरकारच्या प्रयत्नांमुळे शिवराज्याभिषेक दिनापूर्वी शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखं पुन्हा मायदेशी येतील का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-