‘या’ नेत्यांमुळे शिंदेंची खुर्ची धोक्यात?

मुंबई | भाजपसोबत (Bjp) सरकार स्थापन करुन सहा महिने उलटत नाही तोच शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिंदे गटातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. या नाराज नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे बच्चू कडू यांचं.

जेव्हा शिंदे सरकार स्थापन झालं त्यावेळी मंत्री पद मिळालं नाही म्हणून बच्चू कडूंनी जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. मात्र अजून ही त्यांना सरकारमध्ये मंत्री पदाची संधी दिली नाही. यामुळे बच्चू कडूंची नाराजी शिंदेंची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.

हिवाळी अधिवेशनादरम्यान माझ्याच पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट केला आहे.  माझ्याच पक्षातील एका व्यक्तीला मंत्रिपद मिळालं नाही, तो अशा गोष्टींना पाठबळ देतोय, असा गौप्यस्फोट कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला होता.

अब्दुल सत्तारांचा रोख थेट आमदार संजय शिरसाटांवर होता. मंत्रिमंडळाच्या वाटपावेळी टीईटी घोटाळा बाहेर येतो. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर माफी मागितल्यानंतरही प्रकरण वाढवलं जातं. गायरान जमिनीवरून घेरलं जातं आणि कृषी महोत्सवात वेगवेगळे पासेस छापून वसूलीचा आरोप होतो. या सगळ्याच्या मागे आपल्याच पक्षातील एक नेता असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.

सत्तारांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गटात खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर अब्दुल सत्तार म्हणतात त्या नेत्याला माझं मंत्रिपद गेल्यावर मंत्रिपद मिळेल असं वाटतं. सत्तारांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटात सगळं काही अलबेला नाही हे स्पष्ट झालं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केलेली चर्चा आमच्याच पक्षातील काही आमदार लीक करत असल्याचा गौप्यस्फोट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. याशिवाय टीईटी घोटाळा आणि वाशिममधील गायरान जमीन खरेदी व्यवहाराची माहिती शिंदे गटाच्याच नेत्यांनी विरोधकांकडे पोहचवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं अस्वस्थ झालेल्या सत्तारांनी माध्यमांशी बोलताना नाव न घेता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना टोला हाणला आहे.

अब्दुल सत्तारांमुळं मंत्रिपद गेल्याची भावना संजय शिरसाटांच्या समर्थकांमध्ये आहे. याशिवाय त्यांनी याआधी सामाजिक न्यायमंत्री होणार असल्याची औरंगाबादेत घोषणा केली होती. परंतु सत्तांतर झाल्यानंतरही आमदार संजय शिरसाट, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, बच्चू कडू, शहाजीबापू पाटील, महेश शिंदे, सुहास कांदे आणि अशा अनेक इच्छुक आमदारांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं ते नाराज असल्यानं एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आमदारांची आणि मंत्र्यांची नाराजी पाहता शिंदे गटातील अर्ध्याहून अधिक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आणि अनिल परब यांनी विधानसभेत केला होता. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी यावर आक्रमक प्रतिक्रिया दिल्या तर भाजप नेत्यांनी मौन पाळलं.

आता शिंदे गटात अंतर्गत नाराजी वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-