सरकारमधील प्रत्येकानं आपले पाय जमिनीवर आहेत का पाहावं- संजय राऊत
मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावाने लिहिण्यात आलेल्या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचं काम दिलं होतं, असा धक्कादायक आरोप या पत्रात करण्यात आला आहे. आता याप्रकरणी सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारवर टीका केली असून काही सल्ले देखील दिले आहेत.
परमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कादायक आहे. या प्रकरणामुळे सरकारच्या प्रतिमेवर शितोंडे उडाले आहेत. ते धुवून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी दिल्लीला जाणार असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा करणार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे. आपले पाय जमिनीवर आहेत का हे प्रत्येकानं तपासलं पाहिजे, असा सल्लाही संजय राऊत यांनी सरकारला दिला आहे. पोलीस प्रत्येक सरकारचा कणा असतात, ते स्वाभिमानाचं प्रतिक असतात. राज्यकर्त्यांनी हा कणा कायम मजबूत ठेवायचा असतो. यशवंतरावांपासून आम्ही हे पाहात आलो आहोत. मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी घडल्या त्यावर नियंत्रण पाहिजे होतं, असंही ते म्हणाले.
परमबीर सिंग यांना पदावरुन जावं लागलं, ते उत्तम अधिकारी होते, त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण त्या पत्राच्या सत्यतेचा तपास करावा, असं स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते राज्यातील तपास यंत्रणेचे प्रमुख आहेत, तरीही त्यांनी याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे. यासंदर्भात योग्य तपास होईल, असंही ते म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘…म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पण 100 कोटीमध्ये हिस्सा होता’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
गृहमंत्री अनिल देशमुखांसह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा- तृप्ती देसाई
बाबो! ख्रिस जॉर्डनने एका हातात घेतलेल्या अफलातून झेलवर सगळेच फिदा, पाहा व्हिडीओ
मुख्यमंत्र्यानी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी- अनिल देशमुख
Comments are closed.