“महाराष्ट्र विकून दिल्लीच्या चरणी खोकेच अर्पण करायचेत”

मुंबई | ठाकरे गटाने सामनाच्या (Samana) अग्रलेखातून केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. काही झालं तरी कर्नाटकचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणारे. कारण महाराष्ट्रात एक वाकड्या शेपटीचे बेकायदा सरकार सत्तेवर बसले आहे आणि ते दिल्लीचे गुलाम आहे, अशी टीका ठाकरे गटाने केलीये.

महाराष्ट्राच्या जनतेलाही दिल्लीचे गुलाम बनवण्याचा त्यांचा इरादा आहे. महाराष्ट्र विकून दिल्लीच्या चरणी त्यांना खोकेच अर्पण करायचे आहेत. त्यासाठी छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा दैवतांचे अपमान सहन केले जात आहेत, पण महाराष्ट्राची जनता अपमान सहन करणार नाही. ती वाघाच्या छातीने आणि सिंहाच्या हिंमतीने महामोर्चात सामील होईल. महाराष्ट्रप्रेमींच्या मोर्चात आडवे याल तर याद राखा, असा इशारा शिवसेनेने शिंदे सरकारला दिला आहे.

शिवरायांचा महाराष्ट्र मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही हे दाखवणारा आजचा महामोर्चा आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावांतून लोक मुंबईतील मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान किती प्रखर आहे हे दाखवून देतील, असंही अग्रलेखात म्हटलंय.

महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर बसवलं गेलं आहे. हे सरकार म्हणजे महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे आहेत. हे धिंडवडे रोखण्यासाठीच तमाम महाराष्ट्रप्रेमींचा एक अति विराट मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे, असंही अग्रलेखात म्हटलंय.

राज्यपाल पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राच्या राजभवनात बसून छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करते व मिंधे सरकार त्या अपमानाचे समर्थन करते, असं म्हणत अग्रलेखातून शिवसेनेनं सरकारवर टीका केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-